उल्हासनगर : शासनाने मंजूर केलेल्या जागेवर आधार नोंदणी केंद्र न चालवता अन्यत्र बेकायदेशीर रित्या केंद्र चालवणाऱ्या अमर पवार या व्यक्तीच्या विरुद्ध हिल – लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शहरात आधार नोंदणी केंद्राची ठिकाणे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी २१ / २ /२०१९ यांच्यामार्फत लेखी पत्राद्वारे निश्चित केली आहेत . या पत्राद्वारे उल्हासनगर शहरात राहणाऱ्या अमर पवार या व्यक्तीला प्रभाग समिती -२ च्या कार्यक्षेत्रात आधार नोंदणी केंद्र मंजूर करण्यात आले होते .
सदर ठिकाणी पवार याने आधार नोंदणी केंद्र चालू न करता प्रशासनाची किंवा अन्य प्राधिकरणाची परवानगी न घेता प्रभाग समिती -४ मध्ये उल्हासनगर -५ येथील गाऊन मार्केट,आनंदपुरी दरबार जवळ असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या समाजमंदिर मध्ये सुरू केले होते, हे आधार नोंदणी केंद्र बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून सुरू केले होते .
या संदर्भात काही समाजसेवकांनी आक्षेप घेऊन मनपाचे प्रभाग समिती – ४ चे सहाय्यक प्रभाग आयुक्त महेंद्र पंजाबी यांच्याकडे तक्रार केली असता पंजाबी यांनी प्रत्यक्षात जागेवर जाऊन शहानिशा केली. यानंतर पवार याला संबंधित आधार नोंदणी केंद्राचे कागदपत्रे सादर करण्यास सांगितले तेव्हा परवानगी नसतांना समाजमंदिरात बेकायदेशीर रित्या हे केंद्र सुरू असल्याचे निष्पन्न झाले .
घटनेचे गांभीर्य बघून आधार नोंदणी केंद्र चालक अमर पवार याच्याविरुद्ध सहाय्यक आयुक्त महेंद्र पंजाबी यांनी हिल – लाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे . आरोपी पवार फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत . या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक अरगडे हे करीत आहेत .