‘बुल्लीबाई’ ॲपप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक

मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती
मुंबई – काही दिवसांपूर्वी महिलांची बदनामी करणाऱ्या आणि त्यांचा लिलाव करणाऱ्या ‘बुल्लीबाई’ नामक ॲपचा पर्दाफाश झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. यासंदर्भात बुधवारी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आरोपींची मोडस ऑपरेंडीही स्पष्ट केली.
हेमंत नगराळे बोलताना म्हणाले की, बुल्लीबाई ॲप प्रकरणाचा तपास गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. अजून बराच मोठा तपास करायचा बाकी आहे. आरोपींना कुठलाही फायदा मिळू नये यासाठी काही गोष्टी गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत. इंटरनेटवर वेबसाठी असलेले बुल्ली बाई नावाचे ॲप तयार करण्यात आले होते. विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो या ॲपवर अपलोड करण्यात आले होते, तसेच त्याबाबत आक्षेपार्ह संदेशही लिहिण्यात आला होता. ३१ डिसेंबरला हे ॲप लाँच करण्यात आले होते. याप्रकरणी २ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती नगराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने वेगाने सूत्रे हलवली. बुल्ली बाई नावाने ट्विटर हँडलही करण्यात आले होते. ही वेबसाइट जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ही टीम काम करीत होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने याच्या फॉलोअर्सची माहिती काढली. ही वेबसाइट फक्त पाचच जण फॉलो करीत होते. आतापर्यंत याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक विशाल झा असून, दुसरी आरोपी श्वेता सिंह व तिसरी आरोपी उत्तर सिंह या उत्तराखंड येथील आहेत. विशाल झा हा इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेला विद्यार्थी आहे. या वादग्रस्त ॲपच्या माध्यमातून महिलांच्या भावना दुखावतील असे कृ त्य केले गेल्याने या प्रकरणातील दोषींविरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही नगराळे यांनी दिला. या प्रकरणाचा तपास अजून सुरू असल्याचे हेमंत नगराळे यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाच्या खोलाशी जाण्याचे काम मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. यांसारखी प्रकरणे पुन्हा घडू नयेत, यासाठी महिला आणि मुलींना आवाहन केले जाईल, असे नगराळे यांनी सांगितले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …