फोन टॅपिंग : रश्मी शुक्लांना आरोपी करणार आहात का? हायकोर्टाची पोलिसांना विचारणा

मुंबई – बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदल्या आणि नेमणुकांसदर्भातील गोपनीय कागदपत्रे फोडल्या (लीक)प्रकरणीच्या गुन्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट केले जाणार आहे का? याबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (२१ ऑक्टोबर) मुंबई पोलिसांना दिले. या प्रकरणातील तपासाचा प्रगती अहवाल २५ ऑक्टोबरपूर्वी सादर करावा, असे निर्देशही न्या. नितीन जामदार आणि न्या. सारंग कोतवाल यांचा समावेश असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पोलिसांना दिले. याप्रकरणी यंदा मार्चमध्ये गुन्हा दाखल केला गेला होता, याकडेही खंडपीठाने लक्ष वेधले. याप्रकरणी पुढील सुनावणी २५ ऑक्टोबरला होणार आहे.
रश्मी शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर झाली. आपल्याविरोधातील गुन्हा रद्द केला जावा व या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय्आ) वर्ग करावा, अशी मागणी रश्मी शुक्ला यांनी आपल्या याचिकेमध्ये केली होती. ॲड. महेश जेठमलानी यांनी रश्मी शुक्ला यांची बाजू न्यायालयासमोर मांडली. पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपण रश्मी शुक्ला यांचे नावे आरोपी म्हणून समाविष्ट केले नसल्याचे म्हटले असल्याकडे ॲड. जेठमलानी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. राज्य सरकारच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. दरियस खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले की, रश्मी शुक्लांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट केले गेले नसले, तरी संवेदनशील गोपनीय कागदपत्रे फोडण्यास कोण जबाबदार होते? हे निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे. रश्मी शुक्लांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट केले गेले नसेल आणि पोलिसांचा ते करण्याचा उद्देश नसेल, तर न्यायालय आपला वेळ याचिकेची सुनावणी करण्यात वाया घालवू इच्छित नसल्याचे न्यायाधीशद्वयींनी नमूद केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published.