फडणवीसांचा ‘बॉम्ब’ स्फोट : मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून नबाब मलिकांनी जमीन खरेदी केली

अवघ्या ३0 लाखात केली जमीन खरेदी
मुंबई – मुंबई ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्या आरोपावरून दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. त्यानुसार अखेर फडणवीसांनी मंगळवारी (९ नोव्हेंबर) बॉम्ब फोडलाच. मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान हा सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याने टायगर मेमनच्या नेतृत्वात बॉम्ब कुठे ठेवायचे याची रेकी केली होती. दुसरी व्यक्ती सलीम पटेल. हा सलीम पटेल म्हणजे एका इफ्तार पार्टीत आर. आर. पाटील यांच्यासोबत फोटोत आला होता. त्यावरून त्यांना ट्रोल केले गेले होते. हा सलीम पटेल म्हणजे हसिना पारकरचा प्रमुख माणूस. त्याच्या नावाने पॉवर ऑफ ॲटर्नी तयार व्हायच्या, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
कुर्ल्यात एलबीएस रोडवर गोवावाल्याची जागा होती. सलीम पटेलने त्याची पॉवर ऑफ ॲटर्नी घेतली. त्या जमिनीचा दुसरा भाग शाह वली खान याच्या नावाने आहे. या दोघांनी जवळजवळ तीन एकरची जागा सॉलिड्स नावाच्या कंपनीला विकली. या कंपनीच्या वतीने त्याच्यावर सही केली ती फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी मलिक यांच्या कुटुंबाकडे आहे. स्वत: मलिक काही काळ या कंपनीवर संचालक राहिले आहेत. सॉलिड्सला ही जागा केवळ ३० लाखांत विकली गेली, असा दावा फडणवीस यांनी केला.
मलिक तेव्हा मंत्री होते. त्यांना माहिती नव्हते का सलीम पटेल कोण आहे?, मुंबईच्या गुन्हेगारांकडून, मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? आणि असे काय होते की, एवढी महागडी जमीन तुम्हाला ३० लाखांत मिळाली? त्याला कारण या गुन्हेगारांवर टाडा लागला होता. टाडा कायद्यानुसार गुन्हेगारांची सगळी मालमत्ता जप्त होते. त्यामुळेच यांची मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून तर हा व्यवहार झाला नाही ना?, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. ही एकच नाही अशा पाच मालमत्ता मला सापडल्या आहेत. हे सगळे पुरावे मी तपास संस्थांना देणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही हे पुरावे देणार आहे. त्यामुळे त्यांनाही कळेल की, आपल्या मंत्र्यांनी काय दिवे लावले आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …