पुरावे असतील, तर कोर्टात जा – यास्मिन वानखेडेंचे मलिकांना आव्हान

मुंबई – मीडियासमोर येऊन पब्लिसिटी स्टंट करू नका. तुमच्याकडे पुरावे असतील, तर कोर्टात जा. आपला वेळ वाया घालवू नका. आम्ही तिथे तुम्हाला उत्तर देऊ, असे आव्हानच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना मंगळवारी दिले. यास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले. मलिक आदरणीय मंत्री आहेत; पण त्यांना हे शोभत नाही. ते चुकीची माहिती देत आहेत. तुमच्याकडे पुरावे असतील, तर कोर्टात जा. मीडियाला बोलावून केवळ प्रसिद्धी घेऊ नका. तुमचा वेळही वाया घालवू नका, असे यास्मिन वानखेडे यांनी सांगितले. ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच मलिक आरोप करीत असल्याचा दावाही त्यांनी केला. ड्रग्ज लॉबीने त्यांना प्रवक्ते म्हणून नेमले असावे. त्यांच्या जावयाला अटक केली होती. त्यामुळेच ते आरोप करीत असावेत, असा दावाही त्यांनी केला.
समीर वानखेडे यांचा जन्म दाखला नेटवर मिळत नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते जन्म दाखला का शोधत आहेत? त्यांची रिसर्च टीम आहे ना? मुंबईतील पोस्ट केलेला फोटो दुबईतील दाखवतात. मग त्यांनी शोधावा दाखला, असे सांगतानाच आमचा जन्म दाखला शोधण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही कोण आहात? एखाद्या नोकरशहाचा दाखला काढण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचा दाखला कुणी काढला आहे का? असा सवाल त्यांनी केला.
आम्हाला धमक्या येत आहेत. भीतीही वाटत ओ. आमचे काम काय आहे?, तरीही आम्हाला तुमच्याशी बोलावे लागत आहे. आम्ही काम करणाऱ्या महिला आहोत. आम्हाला धमक्या आणि जीवे मारण्याचे फोन येत आहेत. कापण्याचे कॉल येत आहेत. मला वाटते आता आम्हीही रोज खोटे पुरावे देऊन पीसी घ्यायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला. धमक्या येत असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समीर वानखेडे या सर्व प्रकरणातून बाहेर पडतील. सत्यमेव जयते होईलच. ते बाहेर पडतील. नेहमीच सत्याचा विजय होतो. तो होईलच, असेही त्या म्हणाल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …