ठळक बातम्या

पुण्यात सरकारची डोकेदुखी वाढली : आता एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचेही ‘भीक मागो’ आंदोलन

पुणे – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी पाचव्या दिवशीही आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर कर्मचारी ठाम आहेत. या आंदोलनामध्ये आता एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उतरले आहेत. कुटुंबीयांनी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात रस्त्यावर ‘भीक मागो आंदोलन’ सुरू केले आहे. लहान मुलांसह रस्त्यावर उतरत महिलांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. तसेच थाळी वाजवत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करीत हे ‘भीक मागो’ आंदोलन केले जात आहे. जोपर्यंत राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू ठेवणार, अशी भूमिका आंदोलनात सहभागी झालेल्या कुटुंबीयांनी घेतली आहे.
जर राज्य सरकारमध्ये महामंडळाचे विलीनीकरण झाले तर त्यांच्या पगारात वाढ होईल. कुटुंबाचा आर्थिक दर्जा सुधारेल. या मागण्या मान्य झाल्या तर हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल. त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता येईल अशी भावना आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना असणारे तुटपुंजे पगार, अपुऱ्या आरोग्याच्या सुविधा यांमुळे अनेकदा कर्मचाऱ्यांच्या घरातील सदस्य आजारी पडला तर योग्य उपचार देखील करता येत नाही. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची बिकट स्थिती लक्षात घ्यावी तसेच आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी महिलांनी केली आहे.
दुसरीकडे परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या हमीमुळे पुण्यातून पुन्हा खासगी बसेसच्या वाहतुकीला सुरुवात झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी खासगी बस असोसिएशनला बसेसच्या सुरक्षेची हमी दिल्यानंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून मुंबई, सातारा, सोलापूर, सांगली, औरंगाबादकडे बसेस रवाना झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. याबरोबरच संपाच्या कोंडीत महामंडळ प्रशासनाने शिवनेरी बसचा आधार घेतला आहे. प्रशासनाने शिवनेरी बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. या बसेसवर खासगी बस चालकांची ड्युटी लावण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असताना, गुरुवारी दुपारपासून खासगी बस असोसिएशने सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत बसेसची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment