चुकीच्या कामांचे पुरावे सादर करण्याचे महापौरांचे आव्हान
पुणे – शहरातील सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक करण्यात पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपला अपयश आले आहे. शहराचे मोठे नुकसान हे पाच वर्षांच्या काळात झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सत्तेवर येणार असून, पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचा असेल, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी (३१ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत केला, तसेच सर्वसामान्य माणूस अडचणीत असल्याने दिवाळी होईपर्यंत तरी गॅसच्या दरात किमान पन्नास टक्के सवलत द्यावी, अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केली.
पुणे महानगरपालिकेच्या विकास कामांच्या वादात आता खा. सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे, तर विकासाची कामे सुरू आहेत. भाजपच्या काळातच विकासाला गती मिळाली आहे. तुमच्या गेल्या पंधरा वर्षांच्या काळात कोणती कामे झाली, हे पुराव्यानिशी सिद्ध करावे, असे आव्हान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांना दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिकेतील विकास कामांच्या मंजुरीवरून वाद निर्माण झाला आहे. एका सिग्नल यंत्रणेसाठी तब्बल दोन लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रान पेटविण्यात आले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महापौरांसह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी संघटीतपणे पुणे महानगरपालिकेतील पैशांची लूट केल्याचा आरोप केला आहे.