पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील नानविज फाट्याजवळ कोणार्क एक्स्प्रेसवर दरोडा

दौंड – मुंबईवरून भुवनेश्वरला जाणारी कोणार्क एक्स्प्रेस दौंडला येण्यापूर्वीच नानविज फाटा येथे चोरट्यांनी सिग्नलची वायर तोडली. त्यामुळे सिग्नल अभावी कोणार्क एक्स्प्रेस आऊटर सिग्नल जवळ थांबली. त्यानंतर ३ दरोडेखोरांनी दरोडा टाकला. खिडकीजवळ बसलेल्या २ महिलांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी व मंगळसूत्र त्यांनी हिसकावून नेले. या प्रकरणाबाबत मीनाक्षी गायकवाड (रा. सोलापूर), सहप्रवासी कल्पना श्रीराम यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
ही घटना २६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी महिलांचे दागिने हिसकावून घेतले. महिलांनी आरडाओरडा केला. त्यामुळे दरोडेखोर पळून गेले. परंतु, राकेश गायकवाड या प्रवाशाने दरोडेखोरांचा पाठलाग केला. दरोडेखोरांनी त्याच्यावर दगडफेक केली. यामध्ये राकेश गायकवाड जखमी झाला. दरोड्याची घटना समजताच अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे (लोहमार्ग), सहाय्यक पोलीस निरीक्षक अंतरकर, दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक युवराज कलकुटके, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते मिळून आले नाहीत. लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांनी तपास कामी विविध प्रकारच्या विधायक सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
दरोडेखोर नानविज फाट्यानजीक असलेल्या आऊटर सिग्नल जवळ सिग्नलच्या वायर तोडून सिग्नल बंद करून गाड्या थांबवतात व लूटमार करतात, असे प्रकार अनेक वेळा झालेले आहेत. याठिकाणी रेल्वे सुरक्षादल (आरपीएफ) जवान हे पूर्वी त्या ठिकाणी गस्त घालत होते. परंतु, आता ती प्रथा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे चोरट्यांना सिग्नलची वायर तोडून गाड्या थांबवता येतात व दरोडा घालून लूटमार करता येते. म्हणून आऊटर सिग्नल जवळ कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा राबविण्याचे काम करणे गरजेचे आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …