पाटण्यातील गांधी मैदान बॉम्बस्फोटप्रकरणी मोठा निर्णय;एका आरोपीची निदार्ेष सुटका

पाटणा (बिहार) – आठ वर्षांपूर्वी येथील गांधी मैदानावर नरेंद्र मोदींच्या हुंकार सभेत बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती. याप्रकरणी बुधवारी (२७ ऑक्टोबर) एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था)च्या विशेष न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी फखरुद्दीनची एनआयए न्यायालयाने निदार्ेष सुटका केली आहे. त्याचवेळी हैदर अली, नुमान अन्सारी, मजीबुल्लाह, उमर सिद्दीकी, फिरोज अस्लम, इम्तियाज आलम यांच्यासह नऊ जणांना शिक्षा सुनावण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. येत्या सोमवारी (१ नोव्हेंबर) त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत १८७ जणांची न्यायालयात साक्ष झाली आहे.
पाटण्यामध्ये नरेंद्र मोदींची हुंकार रॅली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या रॅलीशिवाय पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १० वरही स्फोट झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला तर ८० हून अधिक जण जखमी झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी पाटणा येथील गांधी मैदान पोलीस ठाण्यात २७ ऑक्टोबर २०१३ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी एनआयएने या प्रकरणाचा ताबा घेतला आणि १ नोव्हेंबर रोजी दिल्ली एनआयए पोलीस ठाण्यात पुन्हा एफआयआर नोंदवण्यात आला. यामध्ये एका अल्पवयीनसह १२ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच बरोबर, अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच बालगुन्हेगार न्याय मंडळा (जेजेबी)ने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात आरोपी असलेल्या पाच दहशतवाद्यांना यापूर्वीच अन्य एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये उमर सिद्दिकी, अझरुद्दीन, अहमद हुसेन, फक्रुद्दीन, फिरोज आलम ऊर्फ ​​पप्पू, नुमान अन्सारी, इफ्तिखार आलम, हैदर अली उर्फ ​​अब्दुल्ला उर्फ ​​ब्लॅक ब्युटी, मोहम्मद आलम उर्फ ​​पप्पू मोजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज अन्सारी ऊर्फ आलम यांचा समावेश आहे. यापैकी इम्तियाज, उमर, अझहर, मोजिबुल्ला आणि हैदर यांना बोधगया साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …