मुंबई – गोरेगाव खंडणी प्रकरणात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अर्जावर कारवाई करत कोर्टाने परमबीर सिंग यांच्यासह विनय सिंग, रियाझ भाटी यांच्याविरुद्धही अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
परमबीर सिंग यांच्यावर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. इतकेच नाही तर सिंग यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे, मात्र तपास यंत्रणांना अद्याप त्यांचा शोध घेता आलेला नाही. म्हणूनच ठाणे न्यायालयानंतर आता मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
महाराष्ट्र सरकारने बुधवारी परमबीर सिंग यांच्याविरोधात कठोर पावले उचलत त्यांचा पगार रोखण्याचा निर्णय घेतला, तसेच गुरुवारी ठाणे न्यायालयाने परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते आणि आता अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.