पद्मश्री सिंधुताई सपकाळांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे – ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर येथील नवी पेठेतील ठोसरपागा दफनभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महानुभाव पंथाच्या प्रथेनुसार दुपारी १२च्या सुमारास त्यांच्या देहाचे दफन करण्यात आले. शासनाच्या वतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह कला, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.
पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगुल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर महानुभावपंथाच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली. यावेळी गर्दी होऊ नये, म्हणून गांजवे चौक ते ठोसरपागा दफनभूमीपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. कोरोना निर्बंधांमुळे नागरिकांना सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना केल्या जात होत्या. तत्पूर्वी सिंधुताई यांचे पार्थिव हडपसर-मांजरीतील सन्मती बाल निकेतन या आश्रमात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आश्रमासमोर मोठ्या प्रमाणात अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती.
हडपसर-मांजरीतील सन्मती बाल निकेतनमध्ये बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचे पार्थिव दाखल झाले. यावेळी स्थानिकांसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पार्थिव येण्यापूर्वीच पहाटेपासून नागरिकांनी याठिकाणी जमण्यास सुरुवात केली होती.
राज्याच्या विविध भागांतून आलेले नागरिक, त्यांच्या संस्थांच्या कार्यक्षेत्रातील काही नागरिक, कर्मचारी, संस्थेतून बाहेर पडलेली मुले-मुली, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी येथे येऊन अंत्यदर्शन घेतले. नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी रांग लावली होती. सकाळी अकरापर्यंत त्यांचे पार्थिव संस्थेच्या कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पोलीस दलाच्या वतीने यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. महानुभवपंथाच्या रितीरिवाजानुसार प्रार्थना होऊन त्यांच्या पार्थिवाचे पूजन करण्यात आले. त्यांची कन्या ममता सपकाळ, मानसपुत्र दीपक, विनय, अरुण, संजय, मनीष आदींनी पार्थिवाचे पूजन केले. साडेअकरा वाजता फुलांनी सजविलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी पुण्यात नेण्यात आले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …