ठळक बातम्या

पंकजा मुंडेंची शिवसेना आमदार कांदेच्या घरी भेट

नाशिक – सलग दोन दिवस मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत विविध कार्यक्रमांना एकाच व्यासपीठावर हजेरी लावणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे जिल्ह्यात नाना अटकळींसह चर्चेला उधाण आले आहे. भुजबळ-कांदे वादासाठी हा शिष्टाईचा तर प्रयत्न नव्हे ना?, असे अंदाजही अनेकांनी बांधले आहेत.
पंकजा मुंडे यांच्या नाशिक दौऱ्याची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. त्यांना आणि भुजबळ यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा योग भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जुळवून आणला. पंकजांनी सलग दोन दिवस भुजबळांसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. दोन दिग्गज ओबीसी नेते एकत्र आल्याने ते काय बोलणार? याची उत्सुकता होती. याच काळात भुजबळांनी ओबीसी पर्वाचा नारा दिला. कार्यक्रम संपल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अचानक शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या कॉलेजरोड येथील घरी भेट दिली. त्यांच्या कुटुंबासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे अनेकांनी वेगवेगळ्या अटकळी बांधल्या. शिवसेना आमदार कांदे आणि भुजबळ यांच्यातील वाद सध्या भरपूर गाजतो आहे. या वादाच्या शिष्टाईसाठी पंकजांनी भेट घेतल्याची चर्चा रंगली.
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला. आमचे आणि पंकजा मुंडे यांचे घरगुती संबंध आहेत. मी त्यांना बहिणीप्रमाणे मानतो. दरवर्षी आम्ही दिवाळीत भेट घेतोच. या वर्षी योगायोगाने पंकजा या नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्या घरी हजेरी लावली. त्यांना मी दिवाळीचा फराळ दिला. भाऊबीज म्हणून दोन पैठण्या दिल्या, अशी प्रतिक्रिया कांदे यांनी दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …