ठळक बातम्या

नितेश राणेंना जेल की बेल? आज फैसला

कणकवली (सिंधुदुर्ग) – सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना मंगळवारी दिलासा मिळू शकला नाही. तब्बल पाच ते सहा तासांच्या सुनावणीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावणी बुधवारवर ढकलली. न्यायालयाची कामकाजाची वेळ संपल्यामुळे ही सुनावणी बुधवारी ठेवण्यात आली. त्यामुळे नितेश राणे यांना जेल की बेल याचा फैसला बुधवारी होणार आहे.
सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. नितेश राणे यांच्या वतीने ॲड. संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला, तर सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी आणि गजानन तोडकरी यांनी बाजू मांडली. तब्बल पाच ते सहा तास न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतला. फिर्यादी संतोष परब यांनी वकील पत्रावर सही केली नव्हती. नंतर सरकारी वकिलांनी परब यांची सही घेतली. त्यानंतर युक्तिवाद सुरू झाला. २३ डिसेंबरला पोलिसांनी १२० ब हे कलम नंतर लावले. तसेच न्यायालयासमोर १६४ खाली फिर्यादीचा जबाब नोंदवला आहे, असे संग्राम देसाई यांनी न्यायालयाला सांगितले. नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचे संभाषण पोलिसांनी हस्तगत केले आहे. सीडीआर प्राप्त झाला आहे, मग अजून काय हस्तगत करायचे आहे? असा युक्तिवाद ॲड. संग्राम देसाई यांनी केला. आरोपींना समोरासमोर बसवून पोलिसांना काय साध्य करायचे आहे? असा सवालही देसाई यांनी केला. संशयितांना घटना घडल्यानंतर अटक केली. मग ते कुठे राहतात? त्यांचा पत्ता किंवा संशयितांची नावे अद्याप पोलिसांनी उघड केलेली नाहीत. मग नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना नोटीस बजावली हे तपास अधिकाऱ्याला मीडियाला सांगण्याची गरज काय होती?, असा सवाल देसाई यांनी केला.
अर्जदाराच्या वकिलांचा युक्तिवाद आम्ही ऐकला. त्यांना काय म्हणायचे आहे ते आम्ही जाणून घेतले. त्यांनी जे जे मुद्दे मांडले त्याला उत्तर देणे आमचे कर्तव्य आहे. आम्ही युक्तिवाद सुरू केला, पण युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. बुधवारी उर्वरित युक्तिवाद करू, असे सरकारी वकिलांनी सांगितले. तसेच अंतरिम जामिनाची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. संतोष परब यांच्या वतीने ॲड. विकास पाटील-शिरगावकर यांनी बाजू मांडली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …