नितेश राणेंच्या जामिनावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब

मुंबई – भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. शुक्रवारी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाने नितेश राणेंना ११ जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेले नितेश राणे आणि माजी जि.प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज कणकवली येथील सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणेच आहेत, असा दावा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी याप्रकरणी राज्य सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र उशिराने सादर केले गेले. त्यामुळे यावर उत्तर देण्यासाठी नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. ही मागणी स्वीकारत न्या. सी. व्ही. भडंग यांनी या प्रकरणावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली आहे. मात्र तोपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून संरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांच्या वतीने न्यायालयाकडे केली गेली. त्यावर सिंधुदुर्ग पोलिसांनी पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंवर कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी दिलेली तोंडी हमी कायम ठेवली आहे. त्यामुळे ११ जानेवारीपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून मिळालेला दिलासा कायम आहे.
संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्­ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणेंसह अन्य एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्या निकालाला नितेश राणे यांच्या वतीने अ­ॅड. संग्राम देसाई यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत संतोष परब यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला. हा हल्ला आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावर झाल्याचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात आपल्याही अटकेची शक्यता निर्माण झाल्याने नितेश राणे आणि संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …