नाशिकमध्ये होणार मुलींसाठी सैनिकी शिक्षण संस्था; पुढील वर्षी प्रवेश मिळणार

नाशिक – उभ्या महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरणारी आणि मुलगा-मुलगी हा भेद नष्ट करायला सहाय्य करणारी, मुलींच्या कर्तृत्वाला भरारी घेण्यासाठी मदत करणारी अजून एक आशावादी बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्य सरकारकडून आली आहे. आता नाशिकमध्ये चक्क मुलींना सैनिकी शिक्षण मिळणार आहे. त्यासाठी संस्था सुरू करायला सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेतला आहे. औरंगाबादच्या सैनिकी शिक्षण संस्थेच्या धर्तीवर ही संस्था असणार आहे.
या संस्थेला मंत्री दादा भुसे यांनी मान्यता दिल्याचेही समजते. मुंबईतील मंत्रालयात मंत्री दादा भुसे यांच्या दालनात एक बैठक झाली. यावेळी औरंगाबादच्या सैनिकी शिक्षण संस्थेच्या धर्तीवर नाशिकमध्ये मुलींसाठी संस्था सुरू करण्याचा निर्णय झाला. नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या समितीकडून याबाबत महिन्याच्या आत अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर यावर पुढील निर्णय होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मुलींच्या सैनिकी शिक्षणाबाबत यापूर्वी निर्णय दिला आहे. केंद्राने या निर्णयाच्या अनुषंगाने सैन्यातही महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती सुरू केली आहे. विशेष म्हणजे पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रवेशपूर्व परीक्षेसाठीही यंदा अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यामुळे ‘एनडीए’मध्ये दोन वर्षांच्या प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
देहरादून येथील आरआयएमसी या संस्थेनंतर औरंगाबाद येथील सैनिकी शिक्षण संस्थेतून सर्वाधिक विद्यार्थ्यांची ‘एनडीए’साठी निवड होते. सैन्यात मराठी अधिकाऱ्यांची संख्या वाढावी, म्हणून राज्य सरकारने १९७७ मध्ये औरंगाबादेत सैनिकी शिक्षण संस्था सुरू केली; मात्र येथे फक्त मुलांनाच प्रवेश दिला जातो. नाशिकमध्ये मुलींसाठी होणाऱ्या सैनिक शिक्षण संस्थेत २०२२-२३ साठी प्रवेश देण्याचा प्रयत्न राहणार आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …