ठळक बातम्या

नाशिकमध्ये लोककवी विनायकदादा पाठारेंच्या अंत्यसंस्कारप्रसंगी आक्रीत!

स्मशानातच सरणाची लाकडे घेऊन दोन गटांनी फोडली एकमेकांची डोकी
नाशिक – लोककवी विनायकदादा पाठारे यांच्या अंत्यसंस्कारावेळीच जुन्या राजकीय वादातून कार्यकर्ते आपापसांत भिडल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. हे दृश्य इतके भयाण होते की, एकीकडे चिता पेटलेली आणि दुसरीकडे सरणाची लाकडे घेऊन कार्यकर्त्यांनी हाणामारी सुरू केलेली. याप्रकरणी माजी महापौर अशोक दिवे, त्यांचे नगरसेवक पुत्र राहुल दिवे, प्रशांत दिवे आणि पीपल्स रिपब्लिकनचे गणेश उन्हवणे, शशी उन्हवणे, अनिल गांगुर्डे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोककवी पाठारे यांच्या अंत्यसंस्कारासाठी गोदातीरावरच्या अमरधाममध्ये कार्यकर्ते एकत्र आलेले. पाठारे यांना अग्निडाग दिला आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले. ते इतके बेभान झाले होते की, त्यांनी सरणाची लाकडे उपसून हाणामारी सुरू केली. अनिल गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे आणि त्यांचे सहकारी विरुद्ध माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, जयेश सोनवणे, अनिकेत ऊर्फ पप्पू गांगुर्डे, पीपल्स रिपब्लिकनचे गणेश उन्हवणे, शशी उन्हवणे यांच्यात राडा झाला. या मारहाणीत गांगुर्डे पिता-पुत्र जखमी झाले. दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
विनायक पाठारे यांनी आयुष्यभर आपल्या लेखनीतून अन्यायाचा प्रतिकार केला. गीत लेखन, शाहिरी, लावणी, प्रबोधनात्मक गीते रचत त्यांनी अफाट काम केले. ते समतानगरमध्ये रहायचे. सोमवारी त्यांचे निधन झाले, तेव्हा आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी अक्षरश: रांगा लावल्या. मात्र, दुपारी त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी माणसाच्या अंगी असलेले शहाणपण तथाकथित कार्यकर्ते विसरले. खरेतर लोककवी बिरुद मिरवणारे विनायकदादा पाठारे यांना आयुष्यभर उपेक्षा सहन करावी लागली. त्यांच्या मृत्यूनंतरही अक्षरश: सरणावर तुंबळ हाणामारी रंगल्याने या उपेक्षेसोबतच त्यांच्या देहाने इललोकीचा निरोप घेतला.
विक्रांत गांगुर्डे यांनी लावलेले वाढदिवसाचे फलक सप्टेंबर महिन्यात दिवे यांच्या कुटुंबियांनी फाडले. यावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला. विशेष म्हणजे या भांडणापूर्वीही गांगुर्डे आणि उन्हवणे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. मात्र, या मारहाणीचे अतिशय गलिच्छ अशा शिव्यांचे व्हिडिओ शहरभर आणि राज्यभर व्हायरल झाले आहेत. क्षुल्लक कारणावरून आपण कुठल्याप्रसंगी किती घाणेरडे वागू शकतो, हे यातून समोर आले. या मारहाणीने नाशिकची उभ्या महाराष्ट्राभर छि थू होत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …