नाशिकमधील ‘आयटी हब’ चा मार्ग मोकळा; केंद्राकडून २० कोटी मंजूर

नाशिक – मुंबई-पुणे नंतर आता नाशिकमध्येसुद्धा ‘आयटी हब’ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून, ‘आयटी हब’ उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधांसाठी २० कोटी रुपये मंजूर केले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जानेवारीमध्ये या प्रकल्पाचा नारळ फोडण्यात येणार आहे.
नाशिकच्या आडगाव परिसरात अंदाजे दीड हजार एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. येत्या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे. या पार्कमुळे यावर आधारित असलेल्या लोकांना, नाशिकमधील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. सोबतच ज्या मुलांना आयटी हबसाठी मुंबई, पुणे, बंगळुरूला जावे लागायचे, त्यांच्यासाठी हा आयटी हब म्हणजे स्वत:हून चालून आलेली संधी ठरेल. या आयटी हबमुळे स्थानिक नागरिकांना रोजगार आणि नाशिकच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आयटी पार्क ज्या भागात उभारले जात आहे. त्या भागात केवळ बिल्डरांच्या जमिनी असून, या आयटी पार्कसाठी ज्या सुविधा उभारल्या जातील, त्यातून केवळ त्या भागातील बिल्डरांच्या जमिनीचा भाव वाढून त्याचा फायदा केवळ बिल्डरांना होईल, असा आरोप होत आहे. विशेषत: आयटी हबचा विषय महासभेत आणण्यापूर्वी आर्थिक देवाण-घेवाण झाली असून, आपण याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा भाजपच्याच नगरसेवकांनी यापूर्वी दिला आहे. शिवाय विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रावादीच्या नगरसेवकांनी देखील होऊ घातलेली आयटी हब उभारणीची प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप करीत प्रक्रियेला यापूर्वीच विरोध केला आहे. शहरात अनेक जागा असून, त्या जागा सोडून एकाच जागेची निवड या हबसाठी का केली गेली?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपने महापालिकेत नोकर भरतीचा बार उडवून दिला आहे. सोबतच आयटी हब आणि लॉजिस्टिक पार्कसाठीही जागा निश्चित करण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …