नागपूर : एम्प्रेस मॉल ईडीच्या ताब्यात कोलकात्याच्या पथकाने केली कारवाई

७२५ कोटींचे कर्ज बुडविले
नागपूर – अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने शहरातील गांधीसागर तलावाजवळील एम्प्रेस मॉल ताब्यात घेतला आहे. एम्प्रेस मॉलने ७२५ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (पीएमएलए)अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. एम्प्रेस मॉलची मालकी मुंबईच्या केएसएल इंडस्ट्रीजची आहे. त्याचे प्रमुख प्रवीणकुमार तायल आहेत. केएसएल इंडस्ट्रीजने २०१५ मध्ये बँक ऑफ इंडिया आणि आंध्रा बँकेकडून ५२५ कोटी रुपये कर्ज घेतले, तसेच युको बँकेकडून २०० कोटींचे कर्ज घेतले होते. शेल कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या खात्यांत ही रक्कम वळविण्यात आली होती. २०१६ मध्ये हे प्रकरण समोर आले होते.
यापूर्वी मालमत्ता आणि पाणी कर थकविल्याप्रकरणी एम्प्रेस मॉलवर मनपाने कारवाई केली आहे. आता ईडीने हा मॉल ताब्यात घेतला आहे. एखादा मॉल ताब्यात घेण्याची शहरातील ही पहिलीच कारवाई आहे. या मॉलची किंमत ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. २.७०.३७४ चौरस फुटांवर हा मॉल तयार करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) जप्ती आदेशाला केएसएल इंडस्ट्रीजने आव्हान दिले होते. त्यामुळे मॉलवर ताबा घेण्याची प्रक्रिया अडकली होती. हे आव्हान रद्द केल्यानंतर बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक एम्प्रेस मॉलमध्ये पोहोचले. त्यांनी मॉलचा ताबा घेतला.
या मॉलमध्ये कंपन्यांचे किरायाने दिलेले आऊटलेट आणि रेस्टारंट आहेत. अटॅचमेंटची प्रक्रिया झाल्यानंतर ते ईडीला भाडे देणार आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केएसएल इंडस्ट्रीजविरुद्ध पीएमएलएनुसार, गुन्हा दाखल केला होता. ईडीच्या कोलकाता शाखेकडून याचा तपास सुरू होता. ईडीच्या पथकाने यापूर्वी शेल कंपन्यांच्या कार्यालयातही कारवाई केली. तिथून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. मे २०१९ मध्ये एम्प्रेस मॉलवर टाच आणण्यात आली होती. याच समुहाची २२५ कोटी रुपयांची मुंबईतील मालमत्ता ताब्यात घेण्यात आली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …