गुप्तचर संस्थेचा अहवाल
नागपूर – पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी निर्माण झाल्याची घटना ताजी असतानाच आता येथील काही संवेदनशील ठिकाणांची पाकिस्तान पुरस्कृ त दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.
केंद्रीय तपास संस्थांकडून पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालय, रेशीम बागमधील संघाचा डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तेथील सुरक्षाव्यवस्था मजबूत केली आहे. पोलीस आयुक्तांनी शहरातील कोणत्या ठिकाणांची रेकी करण्यात आली याची माहिती दिली नाही, मात्र याप्रकरणी यूएपीएअंतर्गत एक गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
जैश-ए-मोहम्मद संघटनेकडून संघ मुख्यालयासह रिझर्व्ह बँक व अन्य संवेदनशील भागांची रेकी केल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी या भागात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली आहे. या प्रकरणाचा गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, कोण-कोणत्या ठिकाणी रेकी करण्यात आली, याचा तपास सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था वाढवली आहे. जर दहशतवादी संघटनेकडून कोणताही हल्ला झाला, तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास पोलीस सज्ज आहेत, असेही अमितेशकुमार यांनी सांगितले.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …