नबाब मलिक फोडणार आज हायड्रोजन बॉम्ब

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर जमीन खरेदी गैरव्यवहाराचा एक गंभीर आरोप पत्रकार परिषदेत केला. मलिक यांनी मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून कवडीमोल दराने जवळपास तीन एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपांना आता मलिक यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांचा बॉम्ब तर फुटला नाही; पण आम्ही बुधवारी सकाळी १० वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार, असा इशाराच मलिक यांनी दिला.
फडणवीसांचे फटाके भिजले, त्यामुळे आवाज आला नसेल. तुमच्यापूर्वी गोपीनाथ मुंडे होते. त्यांनीही काही मंत्र्यांचे संबंध दाऊदशी जोडले होते; पण माझ्या ६२ वर्षांच्या जीवनात कुणीही अशा प्रकारचा आरोप लावू शकले नव्हते. आज त्यांनी एका जागेवरून आरोप केलाय. मला वाटते तुमचे जे माहितीगार आहेत, ते कच्चे खेळाडू आहेत. तुम्ही सांगितले असते, तर अजून काही कागदपत्रे तुम्हाला दिली असती. आता मी अधिक बोलणार नाही; पण बुधवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी अंडरवर्ल्डला हाताशी धरून संपूर्ण शहराला कसे वेठीस धरले हे उघड करेन, असा इशाराच मलिक यांनी दिला.
फडणवीसांचे लोक कोणत्या अधिकाऱ्याकडून जमिनी हडप करण्याचे काम करीत होते. कशाप्रकारे एक अंडरवर्ल्डचा म्होरक्या विदेशात बसून या शहरातून वसुली करीत होता?, तो म्होरक्या कुणासाठी काम करीत होता?, तो अधिकारी कुणाचा खास होता? याची उत्तरे जाणून घेण्यासाठी बुधवारी सकाळी १०ची वाट पाहा, असे मलिक म्हणाले.
गोवावाला कम्पाऊंडमध्ये आम्ही भाड्यााने राहायला होतो. जागा मालकिणीने आम्हाला जमीन विकण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शाह वली खानचे वडील तिथे वॉचमन म्हणून काम पाहत होते. तिथे शाह वली खानचे एक घरही होते. त्याने तिथे ३०० मीटर जागेवर कब्जा केला होता. आम्हाला रजिस्ट्रीला गेल्यावर ही गोष्ट माहिती पडली. ती जागा घेण्यासाठी आम्ही शाह वली खानला पैसे दिले. कुठल्याही अंडरवर्ल्डच्या माणसाकडून आम्ही जमीन खरेदी केली नाही, असे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …