दोन वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील १३० कोटींपैकी ३१ कोटी रुपयेच खर्च?

मुंबई – मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधीतून वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीसाठी मदत केली जाते. गेल्या दोन वर्षांत या निधीतील केवळ ३१ कोटी रुपयेच खर्च करण्यात आले आहेत. म्हणजे १३० कोटी रुपयांपैकी ३१ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, अजूनही या निधीत ९९ कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती माहितीच्या अधिकारातून उघड केली आहे. गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत जमा रक्कम, खर्च करण्यात आलेली रक्कम आणि शिल्लक रकमेबाबतची माहिती विचारली होती. मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहाय्यता निधी कक्षाने याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत २८ नोव्हेंबर २०१९ पासून आजमितीपर्यंत १३० कोटी रुपये रक्कम जमा झालेली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (मुख्य निधी) नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना ९ कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. वैद्यकीय कारणांसाठी ४९३२ नागरिकांना २२ कोटींचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (मुख्य निधी) ३० सप्टेंबर २०२१ रोजी वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीसाठी मिळून ९९ कोटी रुपये शिल्लक आहेत. २८ नोव्हेंबर २०१९ पासून ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ प्रकरणांत अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती माहितीच्या अधिकारात देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय अर्थसहाय्य जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत प्रत्येक दिवशी सरासरी आठ नागरिकांना अर्थसहाय्य करण्यात येत आहे, असा दावा गलगली यांनी केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …