ठळक बातम्या

देशासमोर आज अनेक प्रश्न; यावर आपल्यालाच उपाय शोधायचा आहे – शरद पवार यांचे आवाहन

मुंबई – आज देशासमोर अनेक प्रश्न, समस्या असून, लोकांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्न आपण सोडवायचे आहेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (१२ डिसेंबर) येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्ताने एक कार्यक्रम आयोजित क रण्यात आला होता. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले. समाजातील प्रत्येक घटक देशाचा चेहरा बदलू शकतो, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
यावेळी शरद पवार म्हणाले की, १२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी माझा वाढदिवस असतो म्हणून नव्हे तर माझ्या आईचा वाढदिवस असतो, म्हणून हा दिवस माझ्यासाठी खास आहे. गंमत अशी आहे, माझ्या घरात १२ डिसेंबरचे तीन-चार वाढदिवस आहेत. जयंत, विभावरी, माझा एक पुतण्या, माझ्या बहिणीची मुलगी तिचा वाढदिवसही १२ डिसेंबर आहे. त्यात आई १२ डिसेंबरची. मी १२ डिसेंबरचा आणि पणतू १३ डिसेंबरचा. काही योग असतो, पण हे आहे ते खरे आहे, असे ते म्हणाले. मी ५० वर्षांचा झालो, तेव्हा काही सहकाऱ्यांनी वाढदिवस साजरा केला. माझ्या ७५व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, १५ राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ८१वा वाढदिवस साजरा करण्याचे औचित्य नाही, मात्र या कार्यक्रमातून पुढील कामासाठी ऊर्जा मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रम आयोजित करणे मला पटलेले नव्हते, पण पक्षाचे आदेश आणि अध्यक्षांनी निर्णय घेतला. तुम्ही सर्वांनी आयोजन केले. मी तुमच्या सर्वांचा अंत:करणापासून आभारी आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रात आणि देशात आणखी काम करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला प्रोत्साहन दिल्याचे ते म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, लोकांनी हा निष्कर्ष काढला पाहिजे की, राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय असेल, अशी बांधणी करायची आहे. समाजावर जे अन्याय-अत्याचार झाले त्याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हवी. अस्वस्थ माणसांशी समरस होणारा कार्यकर्ता व्हायला हवा, असेही त्यांनी म्हटले. समाजातील उपेक्षित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. तो अधिकार त्यांना मिळायला हवा. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवा, असेही पवार यांनी आवाहन केले.
‘ त्या’ फाइलवर नाइलाजाने सही केली
मी कृ षीमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळी माझ्याकडे एक फाइल आली. ब्राझीलवरून धान्य आयात करण्याची ती फाइल होती. शेतीप्रधान देशात दोन वेळेचे अन्न मिळू शकत नाही, याचे मला वाईट वाटले. मी स्वाक्षरी केली नाही. त्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सही करण्यासाठी विनंती केली. सही केली नसती, तर अन्नधान्य संकट उभे राहिले असते. परदेशातून धान्य आयात करण्यासाठी त्यावेळी मी जड हाताने स्वाक्षरी केली. मात्र, त्यानंतर शेतीमध्ये नवीन प्रयोग, तंत्रज्ञान यांसाठी प्रयत्नशील राहिलो. पुढील काही वर्षांत हा देश १८ देशांना अन्न धान्य पुरवणारा देश झाला असल्याचे पवार यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …