तुम्ही आमचेच आहात, संपमागे घ्या – उद्धव ठाकरे

मुंबई – प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय-काय पावले उचलत आहोत ते सांगितले असून, न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केले आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृ पया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करीत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसाराच्या होळ्यांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नयेत, अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …