तिसरी लाट आली, तर ओमिक्रॉनचीच!

आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा
जालना – भारतात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचे ५४ रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट आली, तर ती ओमिक्रॉनचीच असेल. मात्र याबाबत घाबरून जाण्यासारखा विषय नाही. यात रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असून, येणाऱ्या नाताळ आणि नववर्षात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
राज्यात १ कोटी २६ लाख लोक लसीकरणापासून वंचित आहेत. परंतु, सध्या रोज साडेसहा लाख लोकांचे लसीकरण होत असून, या गतीने लसीकरण झाल्यास २० दिवसांत लसीकरण पूर्ण होऊ शकेल, अशी माहितीही टोपे यांनी दिली आहे. लस न घेतलेल्या लोकांची गावनिहाय यादी करून प्रत्येक व्यक्तीला मेसेज पाठवण्यात येणार आहे. सध्या आरोग्य विभागाचे जास्तीत-जास्त लसीकरणावर लक्ष असल्याचे टोपे यावेळी म्हणाले.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी महाराष्ट्र सरकारने लपवली, असे आरोप केले जात होते. परंतु, आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवलेली नाही. अनेकवेळा डिस्चार्ज झाल्यानंतर वेगळ्या कारणाने मृत्यू झाल्यामुळे त्याची नोंद कोरोना मृत्यूमध्ये होत नाही. स्वॅब न घेता केवळ सिटी स्कॅन अहवालावरून पॉझिटिव्ह ठरवलेल्या रुग्णांची संख्या पोर्टलवर अपलोड झालेली नाही. त्यामुळे आकडेवारीमध्ये फरक दिसत असेल, असे टोपे म्हणाले.
आरोग्य भरतीच्या पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत १३ ते १४ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात राज्याच्या आरोग्य विभागाचा सहसंचालक डॉ. महेश बोटले याचाही समावेश आहे. पेपरफुटीनंतर आरोग्य विभागाचा हा पेपर परत घेतला जाणार का? यावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. परंतु, आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्य विभागाच्या फेरपरीक्षेचा निर्णय पोलीस तपासाच्या अहवालानंतरच घेण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून, पोलिसांनी तपास करून त्यांचा अहवाल दिल्यानंतर परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे टोपे म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …