तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत शहीद

पत्नीसह १२ अधिकारी-जवानांनाही हौतात्म्य
नवी दिल्ली – भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्करप्रमुख आणि देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचा बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी दुपारच्या सुमारास लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करीत होते. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत याबाबतची माहिती दिली, तसेच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह अन्य १२ अधिकारी-जवानांचाही मृत्यू झाला. संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून, या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर बुधवारी सकाळी ९ वाजता दिल्लीवरून रवाना झाले होते. त्यानंतर ते सकाळी ११.३५ वाजता कोईम्बतूरला उतरले. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता सुलूरहून हे विमान रवाना झाले होते. त्यानंतर कुन्नूरजवळ दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी ते दुर्घटनेचे शिकार झाले. सीडीएस बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचे महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचे होते, मात्र घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजंूनी झाडेच झाडे आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता.

अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव मोहीम सुरू केली. हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचे असल्याचे सांगितले जाते. एमआय-१७, व्ही-५ या सीरिजचे हे हेलिकॉप्टर होते. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी उशिरा केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली. तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेची सविस्तर माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गुरुवारी संसदेत देणार होते, परंतु त्याआधीच सीडीएस रावत यांच्या निधनाची बातमी आली. त्याआधी बिपीन रावत यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
डिसेंबर २०१९ मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्याआधीच नरेंद्र मोदी सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) पदाची निर्मिती करून त्यांना त्या पदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. २०१६ साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग ३१ डिसेंबर २०१६ ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती. तत्पूर्वी १ सप्टेंबर २०१६ रोजीच त्यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
मृतांमध्ये यांचा समावेश
दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग,गुरुसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी. साई तेजा, हवालदार सतपाल आदी १२ अधिकारी-जवान प्रवास करीत होते.
राष्ट्रपतींचा दरबार हॉल कार्यक्रम रद्द
लष्करप्रमुखांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्या कारणाने मुंबईतील राजभवनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणारा दरबार हॉलचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. या भीषण हेलिकॉप्टर अपघातानंतर राष्ट्रपतींनीही आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …