परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटके नंतर शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याचे संकेत भाजप नेत्यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. यावरुनच आता भाजपाने अनिल परबांना टोला लगावला आहे.
भाजपाचे मीडिया पॅनलिस्ट अवधूत वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, घरी बसून जर सरकार चालवू शकतात तर तुरुंगात बसून ST पण चालवू शकतील. काही शंका?
जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अनिल परब यांना ‘ईडी’ने मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस शनिवारी रात्री बजावली. नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपाच्या काही नेत्यांनी शिवसेनेला धडा शिकविण्याचा इशारा दिला होता. राणे यांनीही शिवसेना नेत्यांना सोडणार नाही, असे विधान केले होते.
राणे यांच्या कोकणातील जनआशीर्वाद यात्रेची सांगता होत असतानाच परब यांना नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई सुडाने आणि ठरवून करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून होत आहे. ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभाग या दोन यंत्रणा भाजपाच्या शाखा असल्याप्रमाणेच काम करत असल्याची टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून दोन दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठीच ईडी व अन्य यंत्रणांचा भाजपकडून वापर केला जात असल्याचे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी नागपूरमध्ये केले होते.