माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली – मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारविरोधात मोठा गंभीर आरोप केला आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. कोविड काळात तर भ्रष्टाचाराने कळस गाठला, असा गंभीर आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी सत्यपाल मलिक यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी गोवा सरकारविरोधात मोठा आरोप केला. सत्यपाल मलिक याआधी गोव्याचे राज्यपालही राहिले आहेत. सत्यपाल मलिक म्हणाले, गोव्यातील भाजप सरकार कोविड परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळू शकले नाही. मी हे खूप विचारपूर्वक बोलतोय आणि मी माझ्या विधानावर ठाम आहे. गोवा सरकारने जे काही केले त्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला. गोवा सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मला गोव्याच्या राज्यपालपदावरून हटविण्यात आले. मी लोहियावादी आहे, चरणसिंग यांच्यासोबत मी काम केले आहे, मी भ्रष्टाचार सहन करू शकत नाही.
गोवा सरकारची घरोघरी रेशन वाटपाची योजना अव्यवहार्य होती. सरकारला पैसे देणाऱ्या कंपनीच्या सांगण्यावरून हे केले गेले. माझ्याकडे काँग्रेससह इतर पक्षांनी चौकशीची मागणी केली होती. मी या प्रकरणाची चौकशी करून पंतप्रधानांना माहिती दिली, असेही सत्यपाल मलिक यांनी सांगितले. पुढे बोलताना सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, गोवा सरकारने मोठा भ्रष्टाचार केला, पण ते त्यांची चूक कधीही मान्य करणार नाहीत ही गोष्ट वेगळी. विमानतळाजवळ एक क्षेत्र आहे, जेथे खाणकामासाठी ट्रकचा वापर केला जातो. कोविडच्या पार्श्वभूमीवर मी सरकारला ते थांबवण्याची विनंती केली होती, परंतु सरकारने ते मान्य केले नाही आणि नंतर तेथील जागा कोविडचे हॉटस्पॉट बनले. आज देशातील लोक खरे बोलायला घाबरतात, असेही कथन त्यांनी केले. सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, मला जे वाटते तेच मी बोलतो, मी कुणाला घाबरत नाही. सरकारला सध्याची राज्यपाल भवनाची इमारत पाडून नवीन इमारत बांधायची होती, पण त्याची गरज नव्हती. सरकारवर आर्थिक दबाव असताना हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …