ठळक बातम्या

‘गोपीनाथगड’ गावा-गावांत पोहोचवण्याचा संकल्प – पंकजा

बीड – भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (१२ डिसेंबर) बीडमधील गोपीनाथगड येथे भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या समर्थकांना आवाहन केले. यावेळी त्या म्हणाल्या, नेहमी गोपीनाथगडावर सगळे नेते, कार्यकर्ते, समर्थक येतात; पण आता यापुढे गोपीनाथगडावर तुम्ही यायची आवश्यकता नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी गरीबांची सेवा करण्याचा जो वारसा दिला आहे, तो आपण गावा-गावांपर्यंत पोहोचवू. गरीबातला गरीब, फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत सेवेचा हा वारसा पोहोचवू. वीटभट्टीवरील कामगार, ऊसतोड कामगार, खडी फोडणाऱ्या सगळ्यांपर्यंत गोपीनाथगड गेला पाहिजे, असा संकल्प करू, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी जमलेल्या समर्थकांना केले.
पंकजा मुंडे यावेळी भाषणात म्हणाल्या, मी आजीला नेहमी विचारायचे, आजी मुंडेसाहेब जन्मले तो दिवस नेमका कसा होता?, तेव्हा आजीने सांगितले, त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती. त्या दिवशी गरीबाच्या घरी गरीबाचे काम करणारा राजा जन्मला, म्हणून तर आज लोक पोवाडे, भारूडाच्या माध्यमातून त्या राजाचे गुणगान करतात. त्यांचे कौतुक करताना लोकांनी माझे नाव घेतले, तेव्हा मला राहवले नाही. हा दिवस माझा नाही. जनतेच्या सेवेसाठी आम्ही संकल्प केला आहे. देशातील सर्व नेते इथे आले की, गोपीनाथगडावर नतमस्तक होऊनच जातात, कारण त्यांनी सगळ्या विचारांशी, जातींशी सलोखा निर्माण केला. त्यांचा हाच वसा पुढे चालवण्याचा दिवस आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात येण्यापूर्वी परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. दुपारी १२च्या सुमारास पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावर प्रवेश केला. तेथे समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. पंकजा यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महादेव जानकर, रत्नाकर गुट्टे, नमिता मुंदडा यांचीही उपस्थिती होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …