कोल्हापुरातील माजी सैनिकाचा बुलढाण्यात खून

मांडुळ सापाच्या आमिषाने बोलावून केला घात
बुलढाणा – दोन तोंडांचा मांडुळ साप देण्याचे आमिष दाखवून कोल्हापुरातील दोघांना बुलढाण्यात बोलावून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कोल्हापुरातील एका माजी सैनिकाचा जीव गेला आहे. आरोपींनी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधत संबंधित दोघांना दोन तोंडांचा मांडुळ साप देण्याचे आमिष दाखवले.
अनिल आनंदा निकम आणि माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील, अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे बुद्रुक येथील रहिवासी आहेत. संबंधित दोघांना पवार नावाच्या व्यक्तीने दोन तोंडांचा मांडुळ देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी पैसे घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा याठिकाणी बोलावले. दोघेही नांदुरा याठिकाणी पोहोचल्यानंतर आरोपीने दोघांना घेऊन जायला दुचाकी पाठवली. दोघांनाही वडोदा येथून तीन किमी आतमध्ये बाभळीच्या जंगलात नेले. येथे आरोपींनी दोघांकडून १ लाख ६ हजार रुपयांची रोकड काढून घेतली.
याठिकाणी दोघांनी मांडुळ सापाची मागणी केल्यानंतर, दोघांनाही झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण क रण्यात आली. या मारहाणीत माजी सैनिक प्रल्हाद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी निकम यांच्या नातेवाईकांना फोन पेवरून काही रक्कम पाठवायला लावून एटीएममधून ही रक्कम काढून घेतली. नंतर आरोपींनी दोघांना पूर्णा नदीच्या पुलावरून खाली फेकले.
जखमी अवस्थेत निकम यांनी अनेक लोकांकडे मदत मागितली; पण त्यांना कोणीही मदत केली नाही. शेवटी एका ॲम्ब्युलन्स चालकाने त्यांना उचलून नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत प्रल्हाद यांना मृत घोषित केले. जखमी अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून नांदोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …