कोरोना लस घ्या, अन्यथा पिझ्झा-बर्गरही मिळणार नाही – राजेश टोपेंचे किशोरवयीन मुलांना आवाहन

मुंबई – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विविध मुद्द्यासंदर्भात एका मराठी वृत्तवाहिनीशी संपर्क साधला. राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागणार का? १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण, मिनी लॉकडाऊन, नाइट कर्फ्यू, रात्रीच्या अनावश्यक सेवा बंद करणे, बाजारापेठेतील गर्दी, लग्न समारंभात होणारी गर्दी यासंदर्भात टोपे यांनी भाष्य केले. राज्यात १५ ते १८ वर्षे वयोगटातील ६० लाख मुलांचे लसीकरण करायचे असून दररोज तीन लाख प्रमाणे २० दिवसांत हे होऊन जाईल, असे राजेश टोपे म्हणाले. मुलांनी कोरोना लस घेतली नाही तर पिझ्झा-बर्गर देखील मिळणार नाही, असे टोपे म्हणाले. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक आहे, त्यामुळे लसीकरण करून घ्या, असे आवाहन टोपे यांनी केले.
आम्ही स्पष्टपणे ठरवलेले आहे की ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल किंवा ४० टक्के बेड्स वापरले जातील त्यावेळी लॉकडाऊन लागेल. मात्र, सध्या तशी परिस्थिती नाही. राज्यातील रुग्णालयातील १० ते १५ टक्के बेड्स व्यापलेले आहेत. राज्यातील मृत्यूदर वाढलेला नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजे असे एका प्रश्नाला उत्तर देताना टोपे यांनी सांगितले. कोरोना प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळे आपण नियम पाळले नाहीत तर अवघड आहे. रात्री फिरण्याची गरज नाही. मुंबईसारख्या शहरात रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत काही निर्बंध लावता येतात का? हे पाहावे लागेल, असे ते म्हणाले. मुंबईत २५ हजारांपर्यंत रुग्ण आढळून येत असतील तर मुंबईतील अनावश्यक सेवा, उशिरापर्यंतचे हॉटेलिंग हे सगळे थांबले पाहिजे. रात्री फिरण्यावर निर्बंध लावता येईल. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. अनावश्यक सेवा बंद करता येतात का यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल, असे राजेश टोपे म्हणाले. लग्न आणि अंत्यसंस्कार थांबवता येणार नाही. लग्ने दोन्ही बाजूंच्या २५-२५ लोकांच्या उपस्थितीत पार पाडावीत. आपल्याला राजकीय कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रमातील गर्दी टाळावी लागेल. त्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे लागेल, असे राजेश टोपे म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …