‘कोरोना’ मृतांच्या यादीमध्ये २१६ जिवंत व्यक्ती

बीड – जिल्ह्यातील अंबाजोगाईत प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. जिवंत व्यक्तींची नावे कोरोना मयतांच्या यादीत समाविष्ट झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३१६ जणांची माहिती आरोग्य विभागाकडे आहे, मात्र आता याच यादीत ५३२ नावे आली आहेत. इतकेच नव्हे तर अंबाजोगाईत जिवंत व्यक्तींचीही नावे मयतांच्या यादीत समाविष्ट आहेत. कोरोनाच्या महामारीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींना सरकारतर्फे ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य शासन स्तरावर झाला. त्यामुळे आता जिवंत व्यक्तीदेखील मयतांच्या यादीत आल्याने खळबळ उडाली.
सरकारच्या निर्णयानंतर महसूल आणि स्थानिक प्रशासन कोरोनातील मयत व्यक्तींची यादी तयार करीत आहेत. या यादीची खातरजमा करण्यासाठी अंबाजोगाई शहरातील मयतांची यादी अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील यांनी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविली. नगरपरिषदेच्या वतीने या यादीची पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी करीत असताना अनेक चमत्कारिक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.
अंबाजोगाई शहरात जिवंत असणाऱ्या व्यक्तींचाही मयत म्हणून समावेश यादीत करण्यात आला आहे. येथील प्रशांतनगर परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते नागनाथ वारद यांचेही नाव मयतांच्या यादीत आले. नगरपरिषदेचे कर्मचारी शुक्रवारी नागनाथ वारद यांच्या कुटुंबाकडे खातरजमा करण्यासाठी गेले. यावेळी आपले नाव मयतांच्या यादीत समाविष्ट असल्याचे ऐकून खुद्द नागनाथ यांनाच धक्का बसला. हा प्रकार पाहून पडताळणीसाठी गेलेले नगरपरिषदेचे कर्मचारीही आवाक् झाले. असाच प्रकार त्याच परिसरात राहणाऱ्या दुसऱ्या कुटुबांशीही घडला. जिवंत व्यक्तींची नावे मयतांच्या यादीत समविष्टच झाली कशी?, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अंबाजोगाई तालुक्यात कोरोनामुळे ३१६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे, मात्र मयतांच्या यादीत ५३२ नावांचा समावेश आहे. ही उर्वरित २१६ नावे आली कुठून? याचा शोध आता प्रशासकीय यंत्रणेला घ्यावा लागणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …