औरंगाबादेत दामिनी पथकाची धाडसी कारवाई
औरंगाबाद – दहावीतील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाला येथील दामिनी पथकाने बेड्या ठोकल्या. या मुलीच्या वडिलांनी सदर शिक्षकाविरोधात छावणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या माहितीवरून दामिनी पथकाने थेट कोचिंग क्लासमध्ये जाऊन संबंधित शिक्षकावर कारवाई केली. अमोल रावसाहेब गवळी, असे या शिक्षकाचे नाव आहे. छावणी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, याप्रकरणी १५ वर्षीय मुलीच्या वडिलांनी दामिनी पथकाला फोन करून क्लासचालक वर्गात कशा प्रकारे छेड काढतो, याबद्दल माहिती दिली होती. ही धक्कादायक माहिती ऐकून पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा उमप, हवालदार आशा गायकवाड, निर्मला निंभोरे, लता जाधव आणि वाहन चालक गिरीजा आंधळे यांनी पडेगाव गाठले. त्यांनी आधी मुलीच्या कुटुंबीयांना विश्वासात घेतले. कुटुंबीयांनी त्यांना आपबिती सांगितली. अमोल गवळी मुलींच्या अंगाला सतत हात लावणे, अश्लील बोलणे, शास्त्रविषय शिकवताना त्यातील अश्लीलतेवर बोलणे, माझ्यासोबत संबंध ठेवल्यास काही होत नाही, असे सतत बोलत होता. तसेच मोबाइलवर त्याने अश्लील मेसेजदेखील पाठवले होते.
सदर शिक्षकावर कारवाई करण्यासाठी दामिनी पथक थेट क्लासमध्ये पोहोचले. माझ्या मुलीला शिकवणी लावायची आहे, असा बहाणा करीत संपूर्ण माहिती विचारून घेतली आणि त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवत शिक्षकावर कारवाई केली. छावणी पोलिसांची गाडी बोलावून सदर शिक्षकाला पथकाने ताब्यात घेतले. मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानुसार, सहाय्यक निरीक्षक मनीषा हिवराळे यांनी मुलीचा जबाब नोंदवला. खासगी कोचिंग क्लासमधल्या शिक्षकाचे हे चाळे गेल्या अनेक महिन्यांपासून चालले होते; मात्र एका मुलीच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार उघड झाला. इतर मुली मात्र याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. मुलींनी अशा प्रकरणांमध्ये उघडपणे बोलून तक्रार करण्याची हिंमत दाखवावी, शहर पोलीस मदतीसाठी सदैव तत्पर असतात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …