पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा लावून धरला आहे. जनावरांची गणना होते, मग आम्हालाही मोजा, अशी मागणी करतानाच केंद्र सरकारमुळेच ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. पुण्यात रविवारी महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी छगन भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी जनगणना झालीच पाहिजे. जनावरांची गणना होते. इथे आम्हाला मोजा. हात वर करून इथे ठराव करा, ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.
फुले, शाहू, आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण मिळालेले लोक या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नाहीत, याचे दु:ख होते, अशी सल त्यांनी बोलून दाखवली, तसेच फुले, शाहू, आंबेडकरांचे पुतळे जागोजागी उभे केले पाहिजेत. ही आपली माणसे आहेत हे सर्व समाजाला सांगितले पाहिजे, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारला ओबीसींची जनगणना करायला त्यावेळी आम्ही भाग पाडले, पण केंद्रात भाजपचे सरकार येताच ओबीसींचा डाटा द्यायला नकार घंटा सुरू झाली. केंद्राच्या या आडमुठ्या भूमिकेमुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. तरीही भाजपचे लोक ओबीसी जनजागरण मोर्चा काढताहेत. हा निव्वळ दुटप्पीपणा आहे, असे ते म्हणाले.
महात्मा फुलेंना ‘भारतरत्न’ दिले गेले पाहिजे, अशी लोकांची मागणी आहे, पण माझी मागणी वेगळी आहे. महात्मा हे पदच मोठे आहे. त्यामुळे तेच राहिले पाहिजे. भुजबळांनी तब्बल अर्धा तास तडाखेबंद भाषण केले. या भाषणात भाजपवर टीका करतानाच आपल्या या भाषणातून त्यांनी शेरोशायरीचीही मुक्तपणे उधळण केली. राज्यातील ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी खुमासदार शेरोशायरीतून आपल्या भावना व्यक्त केल्या. सौ दर्द छिपे हैं सिने में पर कुछ अलग ही मजा हैं हसकर जिने में असे सांगतानाच पुरे पाँच साल सरकार काम करेगी, उसके बाद जायेगी, असे छगन भुजबळ म्हणाले.
भूपेश बघेल सन्मानित
महात्मा फुले यांच्या १३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फुले वाड्यात महात्मा फुले समता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी यंदाच्या महात्मा फुले समता पुरस्काराने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना गौरवण्यात आले. बघेल यांना फुले पगडी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि १ लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …