कामावर हजर एसटी कर्मचाऱ्यांचे वाढीव पगार जमा

मुंबई – एक महिना उलटून गेला तरी तब्बल ७२ हजार एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. जे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, त्यांच्या खात्यात मंगळवारी पगार जमा झाले आहेत. एसटीच्या मोठ्या संपानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक ४१ टक्के पगारवाढ करण्यात आली आहे, मात्र तरीही मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, हे आधीच सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार ४१ टक्के पगारवाढीसह १९ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात मंगळवारी पगार जमा झाले आहेत. एसटी संपकरी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता १२ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला, घरभाडे भत्ता ८-१६-२४ या पटीत वाढवून देण्यात आला, तसेच अंतरिम वेतनवाढ देखील दिली. अशी माहिती देण्यात आली आहे, तर जे कर्मचारी संपावर आहेत, त्यांचे पगार झाले नाहीत. अजूनही जवळपास ७२ हजार एसटी कर्मचारी संपावर आहेत. राज्यात निलंबित कर्मचाऱ्यांची संख्याही जवळपास १० हजारांच्या आसपास गेली आहे, तर सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही तब्बल दोन हजारांच्या वर गेली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …