कल्पनेवर कुणाचा स्वामित्व हक्क असू शकत नाही * ‘झोम्बिवली’ च्या निर्मात्यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

मुंबई – एखाद्या कथेच्या कल्पनेवर कुणाचा स्वामित्व हक्क असू शकत नाही, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने ‘झोम्बिवली’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात न्यायालयाची पायरी चढलेल्या एका अन्य निर्मात्याला दिलासा देण्यास नकार दिला. तसेच या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही फेटाळून लावली. तरुण वाधवा या एका चित्रपट निर्मात्याने ‘झोम्बिवली’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा करीत दावा दाखल केला आहे. आपण मे २०१८ मध्ये ‘झोम्बी’शी संबंधित या चित्रपटाची कल्पना ‘सारेगामा’च्या युडल फिल्म्स या शाखेकडे सादर केली होती. त्यावर युडलने आपल्याला संपूर्ण पटकथा सादर करण्यास सांगितले. आपण पटकथा पूर्ण केल्यानंतर आपल्याला यात आता काही स्वारस्य नसल्याचे सांगत त्यांनी त्यावेळी हा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र, त्यानंतर जुलै २०२० मध्ये सारेगामाने ‘झोम्बिवली’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली. पण त्याची मूळ कथा आपलीच असल्याचा दावा वाधवा यांनी या याचिकेतून केला असून, या चित्रपटाची कल्पना आणि त्या संबंधित सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आला होता. त्यावर नुकतीच न्या. गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
तेव्हा, सारेगामाने या चित्रपटासाठी आपली मूळ कल्पना वापरली असून हा गोपनीयतेचा भंग आहे. तसेच सारेगामाने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपही वाधवा यांच्याकडून करण्यात आला. त्याला सारेगामाकडून तीव्र विरोध करण्यात आला. तसेच आपण वाधवा किंवा इतर कोणाचीही कल्पना चोरलेली नसल्याचा दावाही सारेगामाकडून करण्यात आला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …