कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार कालवश
October 29, 2021
चालू घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, महाराष्ट्र, शहर
249 Views
हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बंगळुरू – सुप्रसिद्ध कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. येथील विक्रम रुग्णालयातील अतिदक्षता विभागा (आयसीयू)मध्ये उपचार सुरू असताना वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी ११.३० च्या सुमारास छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर अभिनेते राजकुमार यांना विक्रम रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा जीव वाचावा म्हणून डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत देखरेख ठेवून होती, परंतु त्यांची प्रकृ ती गंभीर होत गेली आणि उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम रुग्णालयाचे डॉ. रंगनाथ नायक यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. दिवंगत पुनीत राजकुमार हे ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचे पुत्र होते.
चाहते प्रेमाने पुनीत यांना आप्पा म्हणायचे. त्यांनी २९ हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि सर्वोत्कृ ष्ट बालकलाकाराचा पुरस्कारही पटकावला होता. ‘अभी’, ‘अप्पू’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि’अंजनी पुत्र’ यांसारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा होवू’या चित्रपटात ते झळकले होते. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘सुवरत्थान’ या चित्रपटात ते अखेरचे दिसले होते. या चित्रपटासाठी त्यांची खूप वाहवा झाली होती. ‘सुवरत्थान’ हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुनीत राजकुमार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विक्रम रुग्णालय गाठले होते. पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली. टॉलीवूडपासून बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अभिनेता सोनू सूद, ज्येष्ठ चित्रपट निर्मात बोनी कपूर, क्रिकेटर वीरेंद्र सिंह सेहवाग, वेंकटेश प्रसाद आदींनी ट्विट करून पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली.