औरंगाबाद : सोशल मीडियावरील मैत्रीतून २१ लाखांचा गंडा

आंतरराष्ट्रीय भामटा दिल्लीतून जेरबंद
औरंगाबाद – आशिषकुमार भगवानदीप मौर्य नावाच्या सायबर गुन्हेगाराला पकडण्यात औरंगाबाद सायबर पोलिसांना यश आले आहे. मागील वर्षी दिवाळीच्या काळात एका महिलेला गिफ्ट पाठवून ते सोडवून घेण्याच्या नावाखाली सतत पैशांची मागणी करीत आशिषकुमार भगवानदीप मौर्य या आरोपीने तब्बल २१ लाख रुपये लाटले होते. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने सिडको पोलीस ठाण्यामध्ये डिसेंबर महिन्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा तपास औरंगाबाद सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. सायबर पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचे संपूर्ण धागेदोरे उलगडत दोन दिवसांपूर्वी या आरोपीला दिल्लीत जाऊन जेरबंद केले.
सिडको एन-५ सह्याद्रीनगर येथील खासगी नोकरी करणाऱ्या ३७ वर्षीय महिलेची मागील वर्षी ली चँग (अँड्रेसन) या विदेशी व्यक्तीसोबत ओळख झाली. त्याने आपण जर्मनीहून बोलत असल्याचे सांगितले व या महिलेला व्हॉट्सॲप नंबर दिला. दिवाळीनिमित्त त्याने महिलेला गिफ्टही पाठवले होते. तीन दिवसांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधून पार्सल आल्याचे सांगितले. पार्सल सोडवण्यासाठी ३० हजार रुपये शुल्क भरावे लागेल, असेही त्याने सांगितले. १६ नोव्हेंबर २०२० रोजी महिलेने ३० हजार पाठविले. त्यानंतरही तो तिच्याकडे वेळोवेळी पैशांची माागणी करीतच गेला. महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांत २१ लाख ५० हजार रुपये भरले होते.
पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सायबरचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या टीमकडे हे प्रकरण सोपवले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे पथक दिल्लीत गेले होते. हा आरोपी दिल्लीतून महागडे गिफ्ट महिलेला पाठवत होता. त्यावरून पोलीस पथकाने त्याचे ठिकाण शोधले. ३० ऑक्टोबरला दिल्लीत गेलेल्या पथकाने सापळा रचला, मात्र आरोपीला चाहूल लागल्याने त्याने पळ काढला, पण त्याच ठिकाणी दोन किलोमीटर पाठलाग करीत पथकाने त्याला पकडले. दिल्ली न्यायालयातून त्याचा ट्रांझिट रिमांड घेऊन पथक बुधवारी औरंगाबादेत दाखल झाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …