एसटी संप : उद्यापर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

कामगार संघटनांची याचिका
मुंबई – एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे, यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बुधवारी संपाविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. एसटी महामंडळाने संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका सादर केली आहे. शुक्रवारपर्यंत कामगार संघटनांना या अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. सकाळी साडेदहा वाजता न्या. एस. काथावाला आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.
एसटी महामंडळाने संपकऱ्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका सादर केली आहे. न्यायालयाचा अवमान करीत संप करणाऱ्यांना नोटीस जारी करण्याची महामंडळाकडून उच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली. संप न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश असूनही कामगार संपावर ठाम असल्याची माहिती महामंडळाकडून उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्याची दखल घेत शुक्रवारपर्यंत कामगार संघटनांना अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश देत पुढील सोमवारी नियमित न्यायालयापुढे सुनावणी होणार असल्याचे उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले; मात्र कनिष्ठ वेतनश्रेणी कामगारांच्या वतीने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या अवमान याचिकेला विरोध करीत ही याचिका दाखल होण्यायोग्य नाही, असे उच्च न्यायालयाला सांगितले.
एसटी महामंडळाने एकूण ३४३ जणांविरोधात अवमान केल्याबद्दल नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. यात संपात सहभागी झालेल्या संघटनांचे नेते, पदाधिकारी तसेच इतर कामगारांना संपाच्या काळात कामावर न येण्यासाठी चिथावणी देणाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …