एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे परिपत्रक जारी

१० वर्षे सेवा झालेल्यांचा पगार ५ हजारांनी वाढणार

मुंबई – अखेर एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि वेतनवाढीचे परिपत्रक जारी क रण्यात आले आहे. सध्या कामावर हजर असलेले एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वेतन १० डिसेंबरपर्यंत होणार असल्याचे समजते. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी या वेतनवाढीची घोषणा केली होती; मात्र राज्यातील अनेक आगारातील एसटी कर्मचारी आणि अधिकारी संपावर ठाम आहेत. त्यातच हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार नवनियुक्त आणि १० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार ५ हजारांनी वाढणार आहे. १० ते २० वर्षांची सेवा झालेल्यांचा पगार ४ हजारांनी आणि २० वर्षांपुढील सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार फक्त २५०० रुपयांनी वाढणार आहे.
पगारवाढीनंतरही गेल्या २२ दिवासांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विलिनीकरणाच्या मुद्यावर कामगार अडून बसले आहेत, तर दुसरीकडे सरकारनेही निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ८१९५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर १८२७ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागांतून कर्मचारी आझाद मैदानात आले आहेत. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत जाणार नाही या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. बुधवारी मुंबईत पाऊस पडत असूनही एसटी कर्मचारी निर्णयावर ठाम राहिले. ते आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. ऊन असो की, पाऊस कितीही मोठे तुफान आले तरी विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.
या विभागांत काम बंद
एसटीतील प्रशासकीय विभागात ९ हजार ४२६ कर्मचारी आहेत. त्यापैकी ९ हजार ५३ कर्मचारी कामावर आले आहेत, तर ३७३ कर्मचारी संपात सहभागी आहेत. कार्यशाळा विभागात एकूण १७ हजार ५६० कर्मचारी आहेत. त्यापैकी ५ हजार ४८८ कर्मचारी कामावर परतले आहेत. १२ हजार ७२ कर्मचारी संपात आहेत. एसटीत ३७ हजार २२५ चालक आहेत. त्यापैकी २ हजार २७१ चालक कामावर आले आहेत. ३४ हजार ९५४ चालक संपात आहेत. एसटीत एकूण २८ हजार ५५ वाहक असून, त्यापैकी २ हजार २७४ वाहक कामावर आले आहेत. तसेच, २५ हजार ७८१ वाहक संपात आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …