ठळक बातम्या

एमपीएससी-२०१९ यशवंतांना दिलासा; नियुक्तीचे आदेश

१७ जानेवारीपासून प्रशिक्षणाला सुरुवात
मुंबई – २०१९ मध्ये महाराष्ट्र लोक सेवा आयोगा (एमपीएससी)ची राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या ४१३ विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत, तसेच येत्या वर्षात १७ जानेवारीपासून या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे २०२२ हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खरोखरच आनंदवार्ता घेऊन आले आहे, असेच म्हणावे लागेल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २०१९ च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. अद्यापही नियुक्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. २८ सप्टेंबर २०२१ रोजी या २०१९ मधील परीक्षेचा सुधारीत निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यात उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा ४१३ पदांचा समावेश होता.
हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या थंड कारभारावर ताशेरे ओढले होते. राज्यात असंख्य प्रश्न प्रलंबित असताना केवळ राजकीय शेरेबाजीवर भर दिला जातोय. अनेक विभागांतील भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. राज्यात एवढे गंभीर प्रश्न असताना सरकार काहीही निर्णय घेत नाही, त्यामुळे राज्य सरकार हरवलेय, अशा शब्दांत टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने एमपीएससीच्या २०१९ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसंबंधीचा निर्णय घेतल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …