मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या विभागीय आयुक्तपदी विजेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ते आपल्या मूळ विभागामध्ये (महसूल गुप्तचर संचालनालय) रुजू होणार आहेत. विजेंद्र सिंग यांनी मंगळवारी समीर वानखेडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. विजेंद्र सिंग हे आयआरएस (भारतीय महसूल सेवा) अधिकारी आहेत. समीर वानखेडे यांचा विभागीय संचालक म्हणून एनसीबीतील कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ अखेर संपला. त्यांना तिसरी मुदतवाढ नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना आता त्यांच्या मूळ विभागात परत जावे लागणार आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ खूपच गाजला. मुंबईत सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण गाजत होते. त्याचवेळी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या एनसीबीच्या विभागीय संचालकपदी समीर वानखेडे यांची नेमणूक झाली. समीर वानखेडे यांची ३० ऑगस्ट, २०२० रोजी नेमणूक झाली होती.
समीर वानखेडेंना पुन्हा ६ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ ३० ऑगस्ट, २०२१ पर्यंत होती. या कालावधीतही त्यांनी अनेक कारवाया केल्या. यानंतर त्यांना पुन्हा दुसरी मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ अशी होती. या कालावधीतही त्यांनी अनेक मोठ्या केसेस केल्या. नवाब मलिक यांचे जावई समीर खान, शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान, अरमान कोहली आदींविरोधात त्यांनी मोठ्या कारवाया केल्या, मात्र याच कारवायांमुळे ते नंतर अडचणीत आले. समीर वानखेडे यांनी केलेल्या पाच कारवायांची पुन्हा नव्याने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांची चौकशी सुरू झाली. आर्यन खान याला सोडण्यासाठी २५ कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यामुळे समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत दोन विशेष पथके नेमण्यात आली आहेत. आर्यन खान याला सोडण्यासाठी मागण्यात आलेल्या पैशांसंदर्भातील चौकशी करण्यासाठी पथक नेमण्यात आले होते, तर दुसरे पथक समीर वानखेडे यांनी केलेल्या पाच प्रकरणांच्या चौकशीसाठी होते.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …