उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाने संपवले जीवन

उस्मानाबाद – जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या एका शिवसैनिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दत्तात्रय नारायण वऱ्हाडे, असे या शिवसैनिकाचे नाव आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी शिवसेनेच्या भगव्यानेच गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली. उस्मानाबादेतील त्यांच्या घराशेजारील झाडाला भगव्याच्या सहाय्यानेच त्यांनी गळफास घेतला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम श्रद्धा असणारे कार्यकर्ते म्हणून त्यांना परिसरात ओळखले जात होते. १९८४ साली त्यांनी जिल्ह्यातील पहिली शिवसेनेची शाखा उस्मानाबाद शहरात स्थापन केली होती. अगदी मोजक्या तरुणांना सोबत घेऊन त्यांनी हे काम केले होते. ही शाखा सुरू करताना दत्तात्रय वऱ्हाडे यांच्याकडे पैसे देखील नव्हते. त्यांनी उधार पैसे घेऊन शाखास्थापना केली होती.
दत्तात्रय वऱ्हाडे यांची उस्मानाबाद शहरात चहाची टपरी होती. त्या चहाच्या टपरीवरच ते कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत होते, पण निवडणुका असतील त्यावेळी ते चहाची टपरी बंद करून शिवसेनेचा प्रचार करायचे. वऱ्हाडे यांना चार मुली आणि दोन मुले आहेत. या चहाच्या टपरीच्या पैशांतूनच त्यांनी आपल्या मुलींची लग्ने केली, तर आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्या मुलांना फारसे शिक्षण घेता आले नाही. अर्ध्यातूनच मुलांनी शिक्षण सोडून कामधंदा करायला सुरुवात केली होती.
मागील ४० वर्षांमध्ये शिवसेनेत अनेक जण आले आणि अनेक जण सोडून गेले. मात्र, दत्तात्रय वऱ्हाडे धनुष्यबाणाशी कायम एकनिष्ठ राहिले. शिवसेनेत येणारे जाणारे अनेक जण मोठे झाले. आमदार झाले, खासदार झाले पण दत्तात्रय वऱ्हाडे कायम कार्यकर्ताच राहिले. कुटुंबाची वाताहत होत असताना फक्त शिवसेनेवर श्रद्धा ठेवून भगव्यासाठीच आयुष्य वेचलेल्या या शिवसैनिकाने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …