उद्योगपती पियुष जैन यांच्या कानपूरमधील घरावर छापेमारी

१५० कोटींहून अधिकची रोकड हस्तगत
कानपूर – आयकर (आयटी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी समाजवादी पक्षाचे नेते आणि उद्योजक पियुष जैन यांच्या येथील निवासस्थानी धाड टाकून सुमारे १५० कोटींहून अधिकची रोकड जप्त केली आहे. पियुष जैन हे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘समाजवादी अत्तर’ लाँच केले होते.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी पियुष जैन यांच्या येथील आनंदपुरी भागातील निवासस्थानी धाड टाकली. या धाडीत जैन यांच्या घरी कपाट, तिजोरी व मोठ-मोठ्या बॉक्समध्ये नोटांची बंडले लपवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. यासंबंधीची काही छायाचित्रे सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली आहेत. आयकर विभागाचे अधिकारी ही रोकड मोजण्यासाठी आपल्यासोबत ४ मशीन घेऊन गेले होते. त्यानंतर सायंकाळी येथील ‘एसबीआय’ मधून आणखी २ मशीन मागवण्यात आल्या. सध्या येथे अशा एकूण १३ मशीनद्वारे नोटांची मोजणी केली जात आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत केवळ ४० कोटींची रक्कम हातावेगळी करण्यात आली होती. सूत्रांच्या मते, जैन यांनी १५० कोटींहून अधिकची रोकड घरी लपवून ठेवली होती.
जीएसटी व आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी शिखर पान मसाल्याच्या कारखान्यावर धाड टाकली होती. या धाडीत जैन व के. के. अग्रवाल नामक अन्य एका उद्योगपतीच्या करचोरीची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही छापेमारी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी अग्रवाल यांच्या घरी काय सापडले? हे अद्याप स्पष्ट केले नाही, पण सूत्रांनी या तिन्ही उद्योगपतींचा एकमेकांशी संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे. शिखर पान मसालावरील छापेमारीनंतर जैन व अग्रवाल सावध झाले होते. त्यांनी आपली रोकड अन्यत्र हलवण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर छापेमारी करून ती जप्त केली. पियुष जैन यांच्या जवळपास ४० कंपन्या आहेत. यापैकी काही शेल कंपन्यांच्या माध्यमातून कर चोरी करण्यात आल्याचा संशय आहे. जैन यांच्या अत्तरचे मुंबईत प्रमुख शोरूम आहे. तेथून अत्तर देश-परदेशात पाठवले जाते. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कानपूर, मुंबई व कनौज येथील सर्वच ठिकाणांवर छापेमारी केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …