ठळक बातम्या

ईडीच्या कारवाईने उद्योजक-राजकारण्यांचे धाबे दणाणले, जालना-लातुरमध्येही धाडसत्र

औरंगाबाद – शहरात गुरुवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कारवाईचे सत्र सुरू झाले होते. गुरुवारी ५४ अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरातील पद्माकर मुळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि बिल्डर जुगलकिशोर तापडिया यांचे निवासस्थान आणि कार्यालय अशा एकूण सात ठिकाणी छापे मारले. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणांवरील सामान आणि कागदपत्रांची झाडाझडती सुरू होती. गुरुवारी रात्रीच ईडीची पथके कागदपत्रे आणि पुराव्यांसह मुंबईत रवाना झाली, तर एक पथक अजूनही शहरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तापडिया यांच्या निराला बाजार येथील बंगल्यावर ईडीने धाड टाकली. तेथे एक महिला अधिकारी व पाच पुरुष अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. बंगल्यातील प्रत्येक खोलीत जाऊन त्यांनी झडती घेतली. काही महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तसेच १२ जणांचे पथक मनमंदिर ट्रॅव्हल्स कार्यालयाच्या मागील कार्यालयात धडकले. त्यांनी पहिल्या मजल्यावरील तापडिया यांच्या कार्यालयात छापा मारून कागदपत्रे हस्तगत केली. नंतर त्याच इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील पद्माकर मुळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यालयात पथक गेले. रात्री उशिरापर्यंत पथक तेथे झाडाझडती घेत होते. उद्योजकांचा मुलगा आणि कार्यालयातील कर्मचारी यावेळी तेथे हजर होते.
शहरात ईडीच्या कारवाईचा बडगा सुरू होताच तापडिया यांच्या मुलाच्या दशमेशनगर येथील महागड्या गाड्यांच्या दालनात मोठी हालचाल सुरू झाली. लाखो रुपयांच्या दुचाकी इतरत्र हलवण्यात आल्या. त्यांच्याकडे असलेल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या चारचाकी चौकशी सुरू असलेल्या गाड्या कार्यालयाखाली उभ्या करण्यात आल्या. ती वाहने काही काळासाठी पथकाने ताब्यात घेतल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, ज्या कारची चौकशी सुरू होती, ती काही दिवसांपूर्वी दिवाळीत खरेदी करण्यात आली असून शहरात एवढी महागडी एकमेव गाडी असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही उद्योजकांची कार्यालये एकाच इमारतीत असल्याने बघ्यांचीदेखील मोठी गर्दी झाली होती.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी जालन्यातील एक कंत्राटदाराचे कार्यालय आणि निवासस्थानावर धाड टाकली. या कंत्राटदाराचे एका राजकीय नेत्याशी जवळकीचे संबंध आहेत. तसेच उदगीर तालुक्यातील तोंडावर येथील प्रियदर्शनी साखर कारखाना तसेच अहमदपूर तालुक्यातील पूर्वीचा बालाघाट व आताचा सिद्धी शुगर्स साखर कारखाना येथेही पथक दाखल झाल्याची माहिती हाती आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …