ईडीची छापेमारी वक्फ बोर्डावर नाही

नवाब मलिक यांचा खुलासा
मुंबई – पुणे आणि अन्य ठिकाणी वक्फ बोर्डावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची छापेमारी सुरू झाल्याची माहिती आहे. या छापेमारीचा संबंध अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याशी जोडला जात आहे. यादरम्यान नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. वक्फ बोर्डात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. ईडीची छापेमारी वक्फ बोर्डावर नाही, तर बोर्डाशी संबंधित कार्यालयांवर सुरू असल्याचे मलिक यांनी सांगितले.
वक्फ बोर्डावर छापे पडले नाही. वक्फ बोर्डाशी संबंधितांच्या कार्यालयावर छापे पडले आहेत. त्याचे आम्ही स्वागत करतो. पुण्यातील एक ट्रस्ट आहे. ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्ट, तालुका मुळशी पुणे ही संस्था वक्फ बोर्डांतर्गत नोंदणीकृत आहे. १९ मे २००५ ला धर्मादाय आयुक्तांकडून वक्फ बोर्डाकडे ही संस्था वर्ग झाली, असे नवाब मलिक म्हणाले.
काही चॅनेलवाल्यांनी सांगितले की, मलिकांच्या घरापर्यंत ईडी येणार आहे. आली तर आम्ही स्वागत करू. मात्र ताबूत इनाम ट्रस्टप्रकरणी छापेमारी होत आहे. त्यात पुण्यात एमआयडीसीत ५ हेक्टर ५१ आर जमीन संपादन करून अधिकाऱ्याकडे पैसे जमा केले. इम्तियाज हुसैन शेख आणि इतर ट्रस्टींनी त्यांना ७ कोटी ७६ लाख ९८ हजार २५० रुपये ताब्याचे पैसे दिले, मात्र कागदपत्रानुसार ९ कोटी ६४ लाख ४२ हजार ५०० रुपये हे संपादनाचे पैसे जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा होते. एका बनावट कागदपत्राद्वारे ३० डिसेंबर २०२० ची कागदपत्रे वापरून ७ कोटी ७६ लाख ९८ हजार २५० रुपये त्यांनी आपल्या अकाऊंटमध्ये घेतले. वक्फ बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी पुण्याचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) खुसरो यांच्या माध्यमातून १३ ऑगस्ट २०२१ रोजी पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर चांद रमजान मुलानी, इम्तियाज महम्मद हुसैन शेख, ॲड. कलिम सय्यद, राजगुरू आणि कांबळे आदींना अटक करण्यात आली, असेही मलिकांनी सांगितले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच दहा सदस्यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली. निवडणुकीद्वारे दोन जणांची नावे आली होती. त्यातील एकाची नियुक्ती केली गेली, अशी माहितीही मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …