ठळक बातम्या

आर्यनच्या जामिनावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

मुंबई – मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारी (२७ ऑक्टोबर) पुन्हा एकदा लांबणीवर पडली. याआधी मंगळवारी (२६ ऑक्टोबर)ही त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी एक दिवस लांबणीवर पडली होती. आता त्याच्या जामीन अर्जावर गुरुवारी (२८ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. बुधवारी आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या अर्जावर सुनावणी झाली.
याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी, अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई आणि मुनमुन धमेचाचे वकील अली कशिफ यांनी युक्तिवाद केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असला, तरी अद्याप एनसीबीच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी आहे; मात्र न्यायालयाची वेळ संपल्याने या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. एनसीबीने अधिकारांचा दुरुपयोग करीत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही, असा आरोप आर्यन खानच्या वकिलांनी केला. आर्यन हा शाहरूख खानचा मुलगा असल्याने हे प्रकरण तपासयंत्रणेने ताणून धरले आहे. तो सर्वसामान्याचा मुलगा असता, तर एवढे झालेच नसते. आर्यन खानला या प्रकरणात पूर्णपणे गोवण्यात आल्याचा दावा त्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी उच्च न्यायालयात केला.
उच्च न्यायालयात झालेल्या युक्तिवादावेळी अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई यांनी एका मुद्यावर आक्षेप नोंदवला. रेव्ह पार्टी प्रकरणात आरोपींना पकडल्यानंतर एनसीबीकडून तातडीने त्यांची रक्त तपासणी करणे गरजेचे असते; मात्र या प्रकरणात एनसीबीने आरोपींच्या रक्ताची तपासणी केली नसल्याचा मुद्दा त्यांनी उच्च न्यायालयात उपस्थित केला. यात कट कारस्थानाचा भाग असल्याचा युक्तिवाद देसाई यांनी केला. मुनमुनने कधीच ड्रग्जचे सेवन केलेले नाही. मुनमुन २८ वर्षांची तरुणी आहे आणि तिचा कोणाशीही संबंध नाही. तिला ड्रग्जची कोणतीही चिंता नाही. आता तिची वैद्यकीय तपासणी झाली, तरी काहीच सापडणार नाही. एनसीबी तिचा संबंध दाखवण्यात अपयशी ठरली आहे, असा युक्तिवाद मुनमुन धमेचाचे वकील अली काशिफ यांनी केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …