ठळक बातम्या

आरोग्य भरतीच्या गट ‘ क’ परीक्षेचाही पेपर फुटला!

न्यासा कंपनीचे कनेक्शन समोर – अमिताभ गुप्ता
पुणे – आरोग्य भरती प्रक्रिया पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या गट ‘ड’प्रमाणे ‘क’ गटाचाही पेपर फुटला असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. आम्ही दोन एजंट्सना सोमवारी अटक केली असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. गट ‘क’च्या पेपरफुटीमध्ये न्यासा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत लिंक पोहोचत असून, त्यांनादेखील ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
गट ‘क’ पेपरफुटीप्रकरणी पुणे पोलिसांनी सोमवारी दोघांना अटक केली आहे. गट ‘ड’ पेपरफुटीचे गट ‘क’ पेपरफुटीमध्येही कनेक्शन असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गट ‘ड’ परीक्षेच्या पेपरफुटीसंदर्भात आम्ही १५ हून अधिक जणांना अटक केली आहे. तेच लोक गट ‘क’च्या पेपरफुटीमध्ये सहभागी असल्याचे दिसून येते, असे अमिताभ गुप्ता म्हणाले. प्राथमिक माहितीनुसार अधिकारी वर्गातून ४०० ते ५०० तर सॉफ्टवेअर कंपनीकडून ४०० ते ५०० लोकांपर्यंत पेपर पोहोचले असल्याची शक्यता आहे, तर गट ‘क’ साठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले असल्याचे अमिताभ गुप्ता म्हणाले.
गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणात न्यासा कंपनीचे कनेक्शन समोर आल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. न्यासावरही गुन्हा दाखल झाला आहे. चौकशी करून न्यासातील संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. सॉफ्टवेअर कंपनीतील संबंधित व्यक्तींकडून ४०० ते ५०० जणांना पेपर दिला असल्याची शक्यता असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.
३१ ऑक्टोबर २०२१ला आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ची परीक्षा झाली होती. त्यापूर्वी २४ ऑक्टोबरला गट ‘क’ ची परीक्षा झाली होती. आरोग्य भरती, म्हाडा परीक्षा पेपरफुटी आणि टीईटी पेपरफुटीप्रकरणी एकूण २५ आरोपी अटकेत आहेत. तिन्ही परीक्षांसंदर्भातील घोटाळ्यात ते सहभागी आहेत, त्यांच्याकडून काही माहिती आपल्याला मिळाली आहे, काही मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे, असे अमिताभ गुप्ता म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …