आरती देशमुख यांना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. पीएमएलए लवादाने मालमत्तेच्या जप्तीसंदर्भात अंतिम आदेश दिले तरी आमचे आदेश येईपर्यंत यासंदर्भात कोणतीही कठोर कारवाई करू नका, असे स्पष्ट निर्देश शुक्रवारी न्या. गौतम पटेल आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने ईडीला दिले आहेत. यावर आता १० जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या याचिकेत ईडीनेही उच्च न्यायालयात मध्यस्थी (हस्तक्षेप) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय देऊ नका, अशी मागणी करीत ईडीने आरती देशमुखांना उच्च न्यायालयाने तूर्तास दिलेल्या दिलासाविरोधात याचिका दाखल केली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नीच्या मालकीच्या दोन मालमत्ताबाबत तूर्तास कोणतेही आदेश देऊ नयेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने पीएमएलए न्यायिक प्राधिकरणाला दिले आहेत. मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) अंमलबजावणी संचालनालया (ईडी)कडून ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तेवरील जप्ती उठवण्यात यावी, याकरिता आरती देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
ईडीने भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात पीएमएलए अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची ४ कोटी २० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. मेसर्स प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख यांच्या मालकीची आहे. आरती देशमुख यांच्या नावावर असलेला १.५४ कोटींचा वरळीतील फ्लॅट आणि कंपनीच्या नावावर धुतूम (उरण-रायगड) येथे असलेली २.६७ कोटींची जमीनही ईडीने जप्त केली आहे. या मालमत्तेवर ईडीने आणलेली जप्ती उठवावी, अशी मागणी करीत आरती देशमुख यांनी ज्येष्ठ वकील ॲड. विक्रम चौधरी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी न्या. गौतम पटेल आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता काय? अशी विचारणा न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …