ठळक बातम्या

आधी आत्महत्या थांबवा; राज ठाकरेंचे ‘ संपकरी’ एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मुंबई – आत्महत्या करू नका. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडू नका. ही लढाई आपल्याला लढायची आहे. त्यासाठी मनगटात रक्त आणि ताकद असायला हवी, असे सांगतानाच आत्महत्या करणाऱ्यांचे मी नेतृत्व करणार नाही ही माझी अट आहे. त्यामुळे आत्महत्या थांबवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी एसटी कामगारांना केले.
एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृ ष्णकुंज’वर भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. एसटी कामगार नेत्यांनी पोटतिडकीने आपले म्हणणे राज ठाकरेंसमोर मांडले. यावेळी राज ठाकरे यांनी मी तुमच्या लढ्याचे नेतृत्व करेन, पण तुम्ही आत्महत्या करू नका ही माझी अट आहे, असे त्यांना सांगितले; तसेच मी याबाबत राज्य सरकारशी चर्चा करून तुमच्याशी पुन्हा बोलतो, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी कामगारांना दिले. राज ठाकरे आणि कामगारांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली.
या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधून बैठकीची माहिती दिली. एसटी कामगारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्य सरकारशी चर्चा करण्याचे राज ठाकरे यांनी ठरवले आहे. ते ताबडतोब सरकारशी बोलणार आहेत. स्वत: राज ठाकरे जातीनिशी लक्ष घालून हा प्रश्न सोडवणार आहेत. एकदा सरकारशी बोलणे झाले की, मग कामगारांशी बोलेन असे आश्वासन राज यांनी दिले आहे, असे नांदगावकर यांनी सांगितले. राज यांना सरकारमध्ये कोणाशी बोलायचे याची पुरेपूर कल्पना आहे. तेच बोलतील तेव्हा तुम्हाला कळेल. तुम्हालाही माहीत आहे ते कुणाशी बोलतील, असेही ते म्हणाले. मनसेचे वकील एसटी कामगारांसोबत राहतील. यापुढेही आम्ही त्यांच्यासोबत राहणार. पक्षही असेल आणि आमचे वकीलही राहतील. कायदेशीर लढाई सुरूच राहील, असे नांदगावकर म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …