आजपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन

मुंबई – राज्याचे हिवाळी अधिवेशन बुधवार (२२ डिसेंबर)पासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. यावेळचे अधिवेशन विविध मुद्यांनी गाजणार आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतील विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरील आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हे आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आधीच नागपूरमध्ये न होणारे हिवाळी अधिवेशन आणि अधिवेशनाचा कमी कालावधी यामुळे विरोधक आक्रमक आहेत. त्यातच ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सवार्ेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. याचसोबत टीईटी परीक्षा घोटाळा, म्हाडा पेपरफुटी प्रकरण यांसारख्या मुद्यांवरून भाजप अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. कमी कालावधीचे अधिवेशन असले तरी या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे.
यंदाचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर यादरम्यान होणार आहे. कार्यकाळ जरी सात दिवासांचा वाटत असला, तरी शनिवार आणि रविवारमुळे हे अधिवेशन अवघ्या पाचच दिवसांचे असणार आहे.
सध्या राज्यात एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्याप यावर काही तोडगा निघालेला नाही. या मुद्यावरून विरोधक सरकारला चांगलेच धारेवर धरण्याची शक्यता आहे, तसेच आरोग्य विभाग असो किंवा म्हाडाची परीक्षा किंवा एमपीएससी परीक्षा या परीक्षांमध्ये सातत्याने घोळ झालेला पाहायला मिळतो. हा मुद्दाही अधिवेशनात गाजणार असल्याची चर्चा आहे, तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. हा मुद्दा महाविकास आघाडी सरकारने चांगलाच उचलून धरला आहे. यावरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.
अधिवेशन उपाययोजनांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक
मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी अधिवेशनासंदर्भातील आरटीपीसीआर चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह या उपाययोजनांचा उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतला. या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेेंद्र भागवत, सह सचिव (समिती) डॉ. अनिल महाजन, उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव रवींद्र जगदाळे, पोलीस दल, वैद्यकीय विभाग, अग्निशमन यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी सभापती रामराजे नाईक-निबाळकर यांनी दिल्या. अधिवेशन काळात विधान भवन प्रवेशासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस आणि आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. अधिवेशन कालावधीत गर्दी होऊन संसर्ग वाढू नये, यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नसून, स्वीय सहाय्यकांसाठी बसण्याची व्यवस्था विधान भवनासमोरील वाहनतळ आवारात स्वतंत्र मंडप टाकून करण्यात आली आहे. मंत्री महोदयांच्या आस्थापनेवरील कर्मचारी यांना देखील अत्यंत मर्यादित संख्येने प्रवेश देण्यात येत आहे. सभागृहामध्ये सुयोग्य अंतर राखण्याच्या दृष्टीने अधिवेशन कालावधीमध्ये सन्माननीय सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था एक आसन सोडून करण्यात आली असून, गतवर्षीप्रमाणेच सभागृहाच्या गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधान परिषद सभागृहामध्ये आसन व्यवस्था पुरेशी असल्यामुळे सदस्यांची बसण्याची व्यवस्था सभागृहामध्येच करण्यात आली आहे. विधानसभा, विधान परिषद व मध्यवर्ती सभागृहामध्ये निगेटिव्ह प्रेशर यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …